पर्यावरण प्रेमींचा विरोध
गाळ काढणाऱ्या व्यावसायिकांच्या प्रेमापोटी विरोध बासनात गुंडाळला?
By मिलिंद माने
Twitter : @milindmane70
महाड: महाड येथील सावित्री नदीला येणाऱ्या पुरावर उपाययोजना करण्यासाठी नदीतील गाळ व बेटे काढण्याचे काम मागील वर्षाप्रमाणे यावर्षी देखील चालू होणार आहे. मात्र, यामुळे सावित्री नदीतील 168 मगरींचा अधिवास धोक्यात आला आहे. त्यामुळे, गाळ काढण्यास पर्यावरण प्रेमींनी विरोध केला आहे. असे असले तरी वाळू व्यावसायिकांच्या हितापोटी त्यांचा विरोध बासनात गुंडाळण्यात आला आहे.
महाडजवळील सावित्री नदीत मार्श क्रोकोडाइल प्रजातीच्या मगरी (Marsh crocodile) मोठ्या प्रमाणावर आहेत. या मगरी गोड्या आणि कमी क्षार असलेल्या खाऱ्या पाण्यात वास्तव्य करतात. महाड ते केभुर्ली, दासगाव या पट्ट्यात त्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर आहे. या नदीपात्रात नदीच्या गाळाच्या प्रवाहामुळे नैसर्गिक बेटे तयार झाली आहेत. या बेटांवर मगरींचा अधिवास आहे. तेथे त्यांची अंडी आणि पिल्ले या बेटांवर वावरतात व किनाऱ्यावर आसपास फिरतात. महाडमधील सिस्केप संस्थेकडून दरवर्षी या मगरींची गणना केली जाते. सद्यस्थितीत या नदीमध्ये 168 मगरी असल्याचे निदर्शनास आले आहे.
सावित्री नदीपात्रात (Savitri River) असणारी बेटे काढल्यानंतर मगरींचे अस्तित्व धोक्यात येणार आहे. ही बेटे काढण्याला पर्यावरण प्रेमींनी (environment activists) विरोध केला असला तरी प्रशासनाने ही बेटे काढून त्यातील वाळू काढण्याचे धोरण अवलंबिले आहे. पर्यावरण प्रेमींचा विरोध शासनाने व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी बासनात गुंडाळला आहे. महाडमधील सावित्री पात्रात असणाऱ्या मगरी शेड्यूल -एक मधील वन्यजीव प्रकारात येतात. ज्या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत, त्याचे संवर्धन करणे गरजेचे असताना त्यांचे अधिवास नष्ट करण्याचे धोरण शासकीय अधिकाऱ्यामार्फत पद्धतशीरपणे राबविले जात आहे.
महाडमधील सावित्री नदीतील गाळाची बेटे ही मगरींच्या अधिवास साठी अनुकूल आहे. बेटाजवळील दलदल आणि पाण्याची क्षारता ही मगरीसाठी अत्यंत उपयुक्त आहे, असे पर्यावरण प्रेमींचे म्हणणे आहे. साधारणतः मे व जून महिन्यामध्ये मगरी या सध्या अस्तित्वात असणाऱ्या बेटांवर अंडी घालतात. नदीमधील बेडूक व मासे खाऊन मगरींची पिल्ले व मगरी वाढत असल्याचे पर्यावरण प्रेमींकडून सांगण्यात येत आहे. नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर त्यांना नैसर्गिक पद्धतीचे खाद्य मिळत असल्याने त्या मनुष्य वस्तीकडे किंवा किनाऱ्याकडे येत नाहीत. नदीपात्रातील गाळाची बेटे काढली गेली तर मगरी प्रजननासाठी मानवी वस्तीजवळील किनाऱ्याकडे येतील व भविष्यात त्यामुळे मानवी वस्तीला धोका निर्माण होऊ शकेल, अशी भीती पर्यावरण प्रेमी व्यक्त करत आहेत.
याबाबत पर्यावरण प्रेमी व सी स्केप संस्थेचे अध्यक्ष सागर मिस्त्री (Sagar Mistry of Seascape) यांनी आज महाड प्रांत कार्यालयात झालेल्या बैठकीत सावित्री नदीपात्रातील मगरींचे वास्तव्य धोक्यात येणार असल्याचे सांगून बैठकीचे लक्ष वेधले. मात्र, त्यांच्या या निर्णयाला गांभीर्याने न घेता त्यांचा प्रस्ताव जवळपास बासनात गुंडाळण्यात आला, असा आरोप पर्यावरण प्रेमी यांनी केला आहे.