@maharashtracity
प्रांताधिकारी तृप्ती धोडमिसे यांची कारवाई
धुळे
धुळे तालुक्यातील धनूर गावात शिवजयंतीच्या दिवशी ग्रामस्थांनी पूर्वपरवानगी न घेता अनधिकृतपणे शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा बसविला होता. याप्रकरणी धनूर गावच्या ग्रामसेविका व पोलीस पाटील यांना निलंबीत करण्यात आले. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या आदेशान्वये प्रांताधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी ही कारवाई केली.
शिवाजी महाराजांचा पुतळा अनधिकृतपणे बसविल्या प्रकरणी तालुक्यातील धनूरचे पोलीस पाटील संदेश रोहिदास पाटील यांना प्रशासनाने नोटीस बजावली होती. या नोटीस अन्वये लेखी खुलासा सादर करण्याचे कळविल्याने पाटील यांनी लेखी खुलासा सादर केला. मात्र हा खुलासा प्रशासनाने अमान्य केला आहे. त्याचप्रमाणे संदेश पाटील यांना पदावरून तात्काळ निलंबित केल्याचे आदेश उपविभागीय तथा प्रातंधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी काढले आहेत.
दरम्यान याच प्रकरणांमध्ये ग्रामसेविका सुरेखा भिवसन ढोले यांना देखील नोटीस बजावण्यात आली होती. या नोटीसामध्ये ढोले यांनी धनुर ग्रामपंचायतीमध्ये 19 फेब्रुवारी रोजी शिवयजयंती साजरी करणे आवश्यक असतांना कुणाचीही परवानगी न घेता मुख्यालय सोडून गेल्याचे निर्दशनास आल्याचे नमुद केले आहे. तसेच अनधिकृत पुतळा बसवण्यात आल्याची बाब निदर्शनास आली. याकरीता संबंधितांनी शासनाची पूर्व परवानगी न घेता हा पुतळा बसविण्यात आला. ही बाब ग्रामसेविका ढोले यांनी वरीष्ठ अधिकार्यांच्या निदर्शनास आणून देणे गरजेचे असतांना त्यांनी दुर्लक्ष केल्याची बाब नोटीसमध्ये नमुद करण्यात आली आहे. त्यानुसार त्यांनी केलेला खुलासा देखील प्रशासाने अमान्य करीत ढोले यांनाही निलंबित केले. यापूर्वी धनूर गावच्या सरपंचांवरही अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे.