आ.फारुक शाह यांची माहीती
धुळे
धुळे जिल्हा रुग्णालयात एमआरआय मशिन नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. शहराचे आमदार फारुक शाह यांनी जिल्हा रुग्णालयाची पाहाणी केली असता रुग्णांसह रुग्णालयातील डॉक्टर व अधिकार्यांनी एमआरआय मशिनची आत्यंतिक गरज व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर आमदार शाह यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची मंत्रालयात भेट घेत धुळे जिल्हा रुग्णालयात एमआरआय मशिन उपलब्ध करून देण्याबाबत पत्र दिले. यावर मंत्री टोपे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच एमआरआय मशिन उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती आमदार शाह यांनी दिली.
धुळे शहरासह जिल्ह्यातील सर्वसामान्य, गोरगरीब रुग्ण जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येतात. मेंदूविकारासह अन्य जटिल आजारांच्या रुग्णांचे योग्य निदान करण्यासाठी कुठल्याच प्रकारची यंत्रणा रुग्णालयात नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. यामुळे गोरगरीब रुग्णांना खासगी केंद्रांवर जाऊन एमआरआय करावे लागते. यात त्यांना नाहक आर्थिक भूर्दंड सोसावा लागतो. यामुळे धुळे जिल्हा रुग्णालयात तातडीने एमआरआय मशिन उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आमदार शाह यांनी आरोग्यमंत्री टोपे यांच्याकडे केली. यावर मंत्री टोपे यांनी लवकरच जिल्हा रुग्णालयात एमआरआय मशिन उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती आमदार शाह यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली.