कौटुंबिक वादातून घटना घडल्याची माहीती
@maharashtracity
धुळे
मुंबई – आग्रा महामार्गावरील अवधान गावात एकाच कुटुंबातील पाच जणांनी विषारी औषध प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. या सर्वांना हिरे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. दरम्यान, कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहीती पोलिसांनी दिली आहे.
शिरपूर तालुक्यातील दहिवद येथील रहिवासी गणेश रावल गोपाळ (वय 42), जयश्री गणेश गोपाळ (वय 35), गोविंदा गणेश गोपाळ (वय 12), सविता गणेश गोपाळ (वय 14) हे चौघे कामानिमीत्त धुळे शहराला लागून असलेल्या अवधान गावात वास्तव्यास होते. त्यांच्याकडे भरत पारधी (वय 24) हा काही महिन्यांपूर्वी कामाच्या शोधात आला होता. पारधी हा देखील गोपाळ यांच्या घरीच राहत होता.
गोपाळ कुटुंबियांमध्ये काहीतरी कारणावरुन वाद होऊन पाचही जणांनी सोमवारी दुपारी विषारी औषध प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात येताच परिसरातील नागरीकांनी पाचही जणांना हिरे रुग्णालयात दाखल केले. ही माहीती कळताच मोहाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे घटनास्थळी दाखल झाले. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याची माहीती पोलिसांनी दिली.
दरम्यान गणेश, जयश्री, गोविंदा आणि सविता यांची प्रकृति स्थिर आहे. तर भरत पारधी याची प्रकृति गंभीर आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेची मोहाडी पोलिसात नोंद करण्यात आली आहे.