@maharashtracity
धुळे
धुळे ग्रामीणचे काँग्रेसचे आ.कुणाल पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून धुळे तालुक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका देण्यात आल्या. या रुग्णवाहिकांचे लोकार्पण आ.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस डॉ.दरबारसिंग गिरासे, गुलाबराव कोतेकर, लहू पाटील, भगवान गर्दे, बाजीराव पाटील, रितेश पाटील, अशोक सुडके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संतोष नवले, गटविकास अधिकारी आर.डी.वाघ, तालुका आरोग्य अधिकारी तरन्नुम पटेल आदी उपस्थित होते.
धुळे ग्रामीणचे आ.कुणाल पाटील यांच्या स्थानिक विकास निधी 2020-21 अंतर्गत एक कोटी सहा लक्ष रुपये निधीतून लामकानी, नगाव, नेर, आनंदखेडे, शिरुड, कापडणे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. धुळे पंचायत समिती आवारात आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते रुग्णवाहिका लोकार्पण करण्यात आल्यात.
लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलतांना आ.कुणाल पाटील यांनी सांगितले कि, रुग्णांना तत्काळ वैद्यकिय उपचारासाठी आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी म्हणून स्थानिक विकास निधीतून धुळे तालुक्यात रुग्णवाहिका घेण्याचा निर्णय घेतला. कोरोना काळात रुग्णवाहिकांअभावी रुग्णांचे प्रचंड हाल झाले. किंबहूना काहींना जीवही गमवावा लागला. त्यामुळे पुढील काळात अशी गैरसोय होवू नये म्हणून या रुग्णवाहिका जीवनदायी ठरणार आहेत.
धुळे तालुक्यातील आरोग्यसेवा बळकट करण्यासाठी या रुग्णवाहिका उपयोगी पडतील. येणाऱ्या काळात ग्रामीण जनतेला उत्कृष्ट आणि तत्काळ आरोग्यसेवा देता यावी म्हणून मी खंबीरपणे उभा आहे, असेही आ.कुणाल पाटील यांनी शेवटी सांगितले.