@maharashtracity

प्रदीर्घकाळ शून्य नोंद होत असलेल्या वॉर्डांचा पालिका अभ्यास करणार

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या बी वॉर्डात (B ward of BMC) गेले दहा दिवस शून्य कोरोना नोंद होत आहे. अवैध बांधकामांमुळे गर्दीतील इमारती, दाटीवाटीचा परिसर, शिवाय स्वच्छतेचा अभाव असे असताना देखील रुग्णसंख्या शून्य नोंद होत असल्याने बी वॉर्ड सध्या कौतुकाचा विषय ठरत आहे.

गेल्यावर्षी मार्च मध्यावर याच वॉर्डातून भरमसाठ कोरोना रुग्णांची नोंद होत होती. दाटीवाटीत असूनही रुग्णनोंद कमी होत असलेल्या वॉर्डांचा अभ्यास होणार असल्याचे पालिकेकेडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान बी वॉर्ड सर्व मुंबईकरांना परिचित आहे. कोरोना शिखरावर असताना येथील रुग्ण नोंदीचा पालिकेने धसका घेतला होता. मात्र आता हा वॉर्ड कौतुकाचा विषय होत आहे. १० नोव्हेंबर रोजी या वार्डात २ कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. मात्र १० नोव्हेंबरनंतर एकाही कोरोना रुग्णांची नोंद झाली नाही.

सध्या या वॉर्डात दररोज किमान ७०० तरी कोरोना नमुने तपासले जात असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. असे असताना देखील कोरोना नोंद होत नाही. तत्पूर्वी या वॉर्डात दोन अंकी रूग्ण नोंद होत होती. सन २०२० मध्ये एकट्या मार्च महिन्यात या वॉर्डात ४ हजार १२१ रुग्णांची नोंद झाली होती.

Also Read: मुंबईत सक्रिय रुग्णात देखील घट

त्या वेळी एवढ्या मोठ्या संख्येने रूग्ण नोंद होण्यामागील कारण येथील घनदाट वस्ती असल्याचे पालिका अधिकारी सांगतात. आता मात्र या ठिकाणी हर्ड इम्म्युनिटी (Herd immunity) निर्माण झाली असल्याची शक्यता येथील अधिकारी व्यक्त करतात.

तसेच मागच्या वर्षी या वार्डात मृत्यू दर हा १० टक्क्यांवर होता. मात्र पालिकेने अवलंबविलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनांमुळे येथील कोरोना नियंत्रणात आला असल्याचे येथील लोकप्रतिनिधी ही सांगतात.

येथील वस्ती एकमेकांना खेटून असून अवैध बांधकामांचे नियम येथे पाळलेले नाहीत. त्यामुळे कोरोना कमी रूग्ण असल्याने यावर अभ्यास होणार असल्याचे मुंबई महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी (Suresh Kakani) यांनी सांगितले.

दाट लोकवस्ती असलेल्या पण कमी रूग्ण संख्या आढळत असलेल्या पालिकेच्या बी वॉर्ड सह सी वॉर्ड आणि एम पूर्व या वार्डांचादेखील पालिका महामारी संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अभ्यास करणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here