पालिका पाणी व्यवस्थेचे सर्वेक्षण करणार

@maharashtracity

मुंबई: मुंबई महापालिकेची निवडणूक (BMC election) तोंडावर आलेली असताना मुंबई महापालिकेने घाटकोपर, विक्रोळी, कुर्ला येथील डोंगराळ भागात राहणाऱ्या नागरिकांना वर्षानुवर्षे भेडसावणारी पाण्याची समस्या लवकरच मार्गी लावण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई महापालिका या भागात पाणी व्यवस्थेचे सर्वेक्षण करणार आहे.

पूर्व उपनगर भागातील घाटकोपर, विक्रोळी, कुर्ला येथील डोंगराळ भागात पालिकेकडून अत्यंत कमी दाबाने, कमी प्रमाणात पाणीपुरवठा (water supply with low pressure) होतो. डोंगराळ भागात उंचावरील घरांना पाणी पुरवठा करणे काहीसे कठीण व जिकरीचे काम आहे. मुंबईतील इतर भागांप्रमाणे या तीन विभागातील डोंगराळ भागातील झोपडपट्टीत प्रेशरने पाणीपुरवठा होत नसल्याने नागरीकांना पाण्याच्या समस्येला गेल्या अनेक वर्षांपासून तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे या भागातील नागरिक त्यांनी मतदानाच्या जोरावर निवडून दिलेल्या खासदार, आमदार व नगरसेवक यांच्याकडे वारंवार तक्रारी करीत असत.

नगरसेवक तर डोंगराळ भागातील पाणी समस्येबाबत पालिका सभागृह, स्थायी समिती, सुधार समिती, प्रभाग समिती बैठकांत वारंवार विषय उपस्थित करून चर्चा घडवून आणत प्रशासनाकडे दाद मागत असत. डोंगराळ भागात पालिकेने जलवाहिन्यांचे जाळे मोठ्या प्रमाणात निर्माण केले आहे. काही भागात जलकुंभ उभारण्यात आले आहेत. मात्र, या कुंभामध्ये पुरेसे पाणी येत नसल्याने डोंगर भागात पुरेशा दाबाने पाणी मिळत नसल्याने पाणी समस्या काही सुटली नाही. आता पालिका प्रशासन या तिन्ही विभागातील पाणी व्यवस्थेचे सर्वेक्षण करणार आहे.

जलवाहिन्यांचे नकाशे अद्ययावत करणे, जलवाहिन्यांवरील झडपा व छेद जोडण्या यांची इत्यंभूत माहिती एकत्रित करणे, यासाठी जीआयएस प्रणालीचा वापर करण्यावर भर दिला जाणार आहे. सध्या डोंगराळ भागात उपलब्ध जलवितरण व्यवस्थेचा अभ्यास करून सध्याची व भविष्यातील पाण्याची मागणी लक्षात घेवून आवश्यक जलवाहिन्या, जोडण्यांचे नियोजन करण्यात येणार आहे.

पाण्याच्या समान वाटपासाठी (equal distribution of water)व जलवितरण व्यवस्थेतील पाण्याच्या दाबाचे नियमन करण्यासाठी दाब नियंत्रक झडपांवर प्रवाह मापके बसविण्यात येणार आहे. पाणी गळती अन्वेषण व दुरुस्ती यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणानंतर या भागात नियमित, सुरळीत व मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here