मुसळधार पावसाचा पुन्हा एकदा रस्ते, रेल्वे वाहतुकीवर परिणाम

@maharashtracity

मुंबई: मुंबईत शनिवारी सकाळपासून कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा रस्ते व मध्य, हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. कुर्ला व सायन रेल्वे मार्गावर काही प्रमाणात पाणी साचल्याने मध्य, हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती. त्यामुळे प्रवाशांना पुन्हा एकदा त्रास झाला.

शहर व उपनगरातील किंग्जसर्कल, हिंदमाता, कुर्ला, सायन, दहिसर, वडाळा, माटुंगा, अंधेरी सब वे आदी सखल भागात पुन्हा एकदा पाणी साचले. त्यामुळे बेस्ट उपक्रमाला परिवहन विभागाला १७ ठिकाणांहुन होणारी ६९ बस गाड्यांची वाहतूक अन्य पर्यायी मार्गाने वळवावी लागली. त्याचा बसमधील प्रवाशांना त्रास झाला.

मुंबई महापालिकेने सखल भागात साचलेल्या पाण्याचा मोठ्या पंपाच्या व अनेक ठिकाणी बसविण्यात आलेल्या छोट्या पंपाच्या साहाय्याने निचरा केला.

सुदैवाने, दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाला. त्यामुळे पाण्याचा निचरा झाल्या नंतर रेल्वे वाहतूक आणि रस्ते वाहतूकही सुरळीत झाली.

आगामी ४८ तासात मुंबई शहर व उपनगरात अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. नागरिकांनी बाहेरील वातावरण पाहुन केवळ अत्यावश्यक कामांसाठीच घराबाहेर पडावे, असे आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.

दरम्यान, पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ८ ते सायंकाळी ६ या कालावधीत शहर भागात २४.३३ मिमी, पूर्व उपनगरात ६०.८० मिमी आणि पश्चिम उपनगरात ३८.९४ मिमी इतक्या पावसाची नोंद पालिकेच्या पर्जन्य जलमापक यंत्रावर नोंदविण्यात आली आहे.

चेंबूर , गौतम नगर येथे घराची पडझड झाल्याची घटना घडली आहे. मात्र यात कोणतीही जीवित हानी झालेली नसल्याचे समजते. सकाळपासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत शहर भागात २ ठिकाणी, पूर्व उपनगरात ३ ठिकाणी अशा ५ ठिकाणी घरांच्या पडझडीच्या घटना घडल्या आहेत. त्याचप्रमाणे, शहर भागात ४ ठिकाणी, पूर्व उपनगरात ३ ठिकाणी आणि पश्चिम उपनगरात २ ठिकाणी अशा ९ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या आहेत; मात्र त्यात कोणीही जखमी झालेले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here