नगरविकास खात्याचे आदेश

@maharashtracity

मुंबई: ज्या महापालिकांच्या मुदती संपल्या आहेत व ज्यांची मुदत आता संपणार आहे, त्या ठिकाणी निवडणूक घेण्यासाठी आवश्यक प्रभाग रचना पुन्हा नव्याने करण्याचे आदेश राज्याच्या नगरविकास खात्याने (UDD) महापालिकांना (Municipal Corporations) दिले आहेत.

मुंबई महापालिकेने (BMC) आगामी निवडणुकीसाठी तयार केलेली नवीन प्रभाग रचना सरकारने रद्द ठरविल्याने आता पुन्हा नवीन प्रभाग रचना करावी लागणार आहे.

राज्यात काही महापालिकांच्या मुदती संपल्याने त्या ठिकाणी नव्याने निवडणुका घ्याव्या लागणार आहेत. त्यासाठी मुंबईसह काही महापालिकांनी त्यांच्या हद्दीत नव्याने प्रभाग रचना (restructuring of wards) केल्या होत्या. त्यावर हरकती सूचना मागवल्या होत्या. त्या नवीन प्रभाग रचना अंतिम होईपर्यंत राज्य सरकाराने विधीमंडळ अधिवेशनात एक मोठा निर्णय घेऊन राज्य निवडणूक आयोगाकडील (State Election Commission) प्रभाग रचना बदल करणे आदींबाबतचे अधिकार काढून स्वतःकडे घेतले.

त्यानुसार आता राज्याच्या नगरविकास खात्याने (Urban Development Department) आगामी महापालिका निवडणुकीसाठी तातडीने प्रभाग रचना करण्याचे व त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधित प्रशासनाला, आयुक्तांना दिले आहेत.

या आदेशामुळे आता मुंबई महापालिका प्रशासन पुन्हा एकदा नव्याने प्रभाग रचना करण्याच्या कामाला लागली आहे. त्यामुळे निवडणुका लवकरच होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र नेमके केव्हा निवडणुका होतील, याबाबतची तारीख, महिना याबाबतची माहिती समजू शकलेली नाही.

मुंबई महापालिकेची मुदत ७ मार्च रोजी संपली. त्यापूर्वी म्हणजे फेब्रुवारी २०२२ मध्ये निवडणूक होणे अपेक्षित होते. मात्र राज्य सरकारने या निवडणुका पुढे ढकलल्या.

राज्य सरकारने तत्पूर्वी मुंबईत २२७ प्रभाग असताना त्यात आणखीन ९ ने वाढ करून प्रभाग संख्या २३६ एवढी केली. त्याबाबत राज्यपालांनी (Governor) अध्यादेशही (Ordinance) काढले होते. मात्र निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. आता पालिका प्रशासन व निवडणूक विभाग पुन्हा एकदा निवडणूक तयारीला लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here