By सचिन उन्हाळेकर
Twitter: @Sachin2Dav
मुंबई: सर ज. जी. स्कुल ऑफ आर्ट या दृश्यकलेच्या पंढरीमध्ये दक्षिण कोरिया व महाराष्ट्रातील नामवंत कलावंतांच्या कलाकृतींच्या मुंबई बिनालेला कला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. “मुंबई बिनाले” येत्या ३० डिसेंबर २०२२ पर्यंत सुरु राहणार आहे.
मुंबई कोरिया बिनालेची सुरुवात २०१८ मध्ये झाली असून यावर्षी याप्रदर्शनाचे दुसरे पर्व आहे. या प्रदर्शनामध्ये १४५ दक्षिण कोरियन तर महाराष्ट्राच्या विविध भागांतील सुमारे ९० नामवन्त कलाकारांच्या कलाकृती “मुंबई बिनाले” मध्ये पाहायला मिळत आहेत.
असे भव्य मुंबई बिनाले प्रदर्शन ३० डिसेंबरपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य प्रवेश सुरु राहणार आहे. तरी जास्तीत जास्त कला रसिक, कलावंत, कला विद्यार्थी तसेच शालेय विद्यार्थी यांनी या द्वैवार्षिकी महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन सर जेजे स्कुल ऑफ आर्टचे अधिष्ठाता प्रा. विश्वनाथ साबळे यांनी केले आहे.
मुंबई आंतरराष्ट्रीय कलाक्षेत्राचे समग्र प्रतिबिंब असलेल्या कलाकृतींचा अभ्यास तसेच अनेक ज्येष्ठ व तरुण समकालीन कलाकारांशी थेट संवाद साधण्याची आणि नवीन विचारांचे आदान प्रदान करण्याची उपलब्धी या निमित्ताने विद्यार्थ्यांना प्राप्त होत आहे.
“मुंबई बिनाले”मध्ये महाराष्ट्रातील चित्रकारांनी सहभाग घेत त्यांची वास्तववादी आणि अमूर्त चित्र कला रसिकांना प्रदर्शनात पाहायला मिळत आहे. तर कोरियन चित्रकारांची निसर्ग चित्र प्रदर्शनात खास आकर्षण ठरत आहे. यासोबत कोरियन चित्रकारांची वास्तववादी आणि अमूर्त चित्र ही प्रदर्शनात पाहायला मिळत आहे.
कोरियन शिल्पकारांची घटनात्मक तयार केलेले शिल्प या प्रदर्शनात मांडण्यात आलेले आहेत. महाराष्ट्र राज्यातील शिल्पकारांची विषयात्मक विषयाची सांगड घातलेले शिल्प ही प्रदर्शनात आहेत. खासकरून शिल्पकार नितीन मेस्त्री यांचे गो हत्या वरील वास्तवादी शिल्प, तसेच शशांक मशिलकर यांचे भ्रूण हत्यावरील रचनात्मक शिल्प ही येथे बघायला मिळत आहे.
चित्रकार सुहास बहुलकर, राजेंद्र पाटील ( पारा ), विशाखा आपटे, बाळासाहेब पाटील आणि श्रीकांत कदम यांच्या अमूर्त चित्रांसोबत काही वास्तवादी शैलीत काम करणाऱ्या चित्रकारांच्या चित्रकृती या प्रदर्शनात आहेत. यासोबत शिल्पकार अरुणा गर्गे, स्वप्नील गोडसे, मोक्तिक काटे, प्रशांत इप्ते, वैभव मोरे आदीं शिल्पकरांची शिल्पकृती प्रदर्शनात आहेत. यांच्यासोबत जेजेमध्ये अंतिम वर्ष पदवी अभ्यासक्रम व पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन ही येथे पाहता येईल.