मुंबई महानगरपालिका स्तुत्य उपक्रम

@maharashtracity

मुंबई: ईको इंडिया या संस्थेच्या सहकार्याने ४ ऑक्टोबर २०२१ पासून सुरु झालेल्या प्रशिक्षण कार्यक्रमात ४ हजार ९५० परिचारिकांना (Nurses) संसर्ग प्रतिबंधविषयक प्रशिक्षण देण्यात आले. दर आठवड्याला एक दिवस याप्रमाणे सलग १३ आठवडे हा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या संस्थेचे हे कार्य अभिनंदनीय व अनुकरणीय असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. आरोग्य व वैद्यकीय विषयक सेवांबाबत सातत्याने संशोधन होत असते. तसेच या संबंधीच्या तंत्रज्ञानात देखील नियमितपणे प्रगती होत असते. यामुळेच आरोग्य व वैद्यकीय विषयक सेवा (Health and medical services) देणाऱ्या व्यक्तिंना अधिकाधिक परिणामकारक प्रशिक्षण देणे गरजेचे असते. यानुसार ‘संसर्ग प्रतिबंध आणि नियंत्रण’ याबाबत अधिक शास्त्रशुद्ध व अद्ययावत प्रशिक्षणाचा लाभ अधिकाधिक परिचारीकांना मिळावा, या उद्देशाने या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे मुंबई महानगर पालिकेकडून (BMC) सांगण्यात आले.

या प्रशिक्षण कार्यक्रमातून मिळणाऱ्या ज्ञानाचा आणि माहितीचा उपयोग हा परिचारीकांना त्यांच्या दैनंदिन रुग्णसेवेत करता येणार आहे. शिवाय या प्रशिक्षणाला कोविड महामारीची पार्श्वभूमी आहे.

परिचारीकांना या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ईको इंडिया या संस्थेद्वारे टॅबलेट्स देण्यात आले होते. यात मुंबई मनपाची प्रमुख रुग्णालये, उपनगरीय रुग्णालये, प्रसूतीगृहे, आरोग्य केंद्रे इत्यादी ठिकाणी कार्यरत असणाऱ्या परिचारीकांना ‘संसर्ग प्रतिबंध आणि नियंत्रण’ या विषयावर हे प्रशिक्षण देण्यात आले.

‘संसर्ग प्रतिबंध आणि नियंत्रण’ हा विषय अत्यंत महत्त्वाचा असून प्रत्येक आरोग्य कर्मचाऱ्याचे या बाबतचे ज्ञान सतत अद्यावत करणे आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन १३ मॉड्युल्सचे प्रशिक्षण ऑनलाईन व प्रत्यक्ष पद्धतीने आयोजित करण्यात आले होते. यातील १० मॉड्युल्स हे संसर्ग प्रतिबंध आणि नियंत्रण याबद्दल होते. तर ३ मॉड्युल्स हे कार्यक्षमता व कौश्यल्य याबाबत होते, अशीही माहिती या निमित्ताने सार्वजनिक आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here