Twitter : @Rav2Sachin
मुंबई :
सुरक्षा रक्षकांच्या भरती प्रक्रियेत काही बदल करण्यात यावेत, अशी मागणी दी म्युनिसिपल युनियनने केली आहे. याकरिता तुर्तास भरती प्रकिया थांबविण्यात आलेली आहे. युनियनने केलेल्या मागणीवर चर्चा करून त्या संबंधी मागणी पूर्ण करायच्या की नाही, या संबंधी प्रशासनाने निर्णय घेतल्यानंतर भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा होणार आहे, असे महापालिका सुरक्षा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
येत्या दोन वर्षात मुंबई महापालिकेत मोठ्या प्रमाणावर कर्मचारी, कामगार, अधिकारी तसेच वरिष्ठ अधिकारी सेवानिवृत्त होणार आहेत. येत्या दोन वर्षात सेवानिवृत्त होणाऱ्यांची आकडेवारी सुमारे 40 टक्के असल्याने येत्या दोन वर्षात मुंबई महापालिकेला भरती प्रक्रिया राबविणे अत्यंत महत्वाचे आहे. हे लक्षात घेऊनच मुंबई महापालिकेच्या सुरक्षा रक्षक विभागात भरती प्रक्रिया राबिण्यात येत आहे. महापालिकेच्या सुरक्षा विभागात जवळ जवळ ७२० जागा सुरक्षा रक्षकांच्या भरल्या जाणार आहेत. तर सहाय्यक सुरक्षा अधिकारी पदाच्या २५ जागांची भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.
दरम्यान, सुरक्षा रक्षक आणि सहाय्यक सुरक्षा अधिकारी पदाच्या भरती प्रक्रियेत महिला उमेदवारांची उंची दोन इंच कमी करुन ५ फूट ३ इंच करण्यात आलेली आहे. तर पहिल्यांदा सुरक्षा रक्षक भरती प्रक्रियेत लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.
पण या अटी शर्ती सोबत आणखी काही बदल भरती प्रक्रियेत करण्यात यावेत, अशी मागणी दि म्युनिसिपल युनियनने केली आहे. सहाय्यक सुरक्षा अधिकारी पद भरताना सुरक्षा रक्षक विभागात कार्यरत असणाऱ्या इच्छुक उमेदवारांकरीता लेखी परीक्षा घेण्यात येऊ नये. यासोबत भरती प्रक्रियेत माजी सैनिकांसाठी रिक्त असलेल्या जागांसाठी इच्छुक उमेदवारांना चष्मा असला तरी त्यांना भरती प्रक्रियेतून डावलण्यात येऊ नये, अशी मागणी प्रशासनाकडे केली असल्याचे दि म्युनिसिपल युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने यांनी केली आहे.
यासंबंधी पालिका प्रशासनाने निर्णय घेतल्यानंतर सुरक्षा विभागात भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे, असे सुरक्षा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.