@maharashtracity
तरुणाच्या यकृतातून काढला फटाक्यातील ४ सेमी धातूचा तुकडा
मुंबई: तीन वर्षापूर्वी कामासाठी मुंबईत आलेल्या २० वर्षीय आकाश चौधरीला दिवाळीतील अतिषबाजी जीवावर बेतली होती. रस्त्यावर सुरु असलेल्या अतिषबाजीतील एका फटाक्याचा जळता निखारा त्यांच्या छातीवर येऊन आदळला.
मात्र हा जळता निखारा नसून तो धातूचा तुकडा होता. या तुकड्याने शरिरात प्रवेश करत यकृतापर्यंत पोहचला. त्याचा वेग मोठा असल्याने तो पित्ताशय नलिकेच्या अगदी जवळ आला. मात्र ही नलिका थोडक्यात बचावली. अन्यथा आकाशच्या जीवावर बेतले असते.
केईएम (KEM Hospital) रुग्णालयातील डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करुन धातूचा तो तुकडा बाहेर काढला. यामुळे या तरुणाला जीवनदान मिळाले. सार्वजनिक रुग्णालयात अशा गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया होत असल्याने गरिब रुग्णांना आव्हानात्मक शस्त्रक्रियांसाठी हीच रुग्णालये आधारभूत ठरत आहेत.
दिनांक ४ नोव्हेंबर रोजी दिवाळीच्या दिवसात आकाश रस्त्यावर फेरफटका मारण्यास घराबाहेर पडला. गोकुळधाम मार्केट परिसरात फिरत असताना बरीच रात्र झाल्याचे ध्यानात आल्याने तो घरच्या दिशेने माघारी फिरला.
त्याचवेळी त्यांच्या छातीवर वेगात काहीतरी येऊन आदळल्याचे समजले. छातीत जोरदार कळ देखील आली. त्याच्या छातीवर येऊन आदळलेली वस्तू म्हणजे फटाक्यातील जळता निखारा होता. त्या फटाक्यातील ४ सेमीचा धातूचा तुकडा आकाशच्या शरिरात जाऊन यकृतापर्यंत पोहचला.
हा तुकडा पित्ताशय नलिकेपर्यंत पोहचला असता तर त्याच्या जीवावर बेतले असते. आकाशला त्याच्या भावाने रक्तबंबाळ अवस्थेत कुपर रुग्णालयात (Cooper Hospital) दाखल केले. यावेळी तपासणीत छातीतून यकृतापर्यंत पोहचलेली धारदार वस्तू ही ४ सेमीचा धातूचा तुकडा असल्याचे निदान करण्यात आले.
कुपर रुग्णालयात छातीत ट्युब टाकून जमा झालेले फ्ल्यूड काढण्यात आले. मात्र पुढील उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल होण्याची सुचना करण्यात आली.
यावर बोलताना केईएम रुग्णालयातील गॅस्ट्रोटाँलॉजी विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉ. चेतन कंथारिया यांनी सांगितले की, अशी प्रकरणे फार क्वचित घडतात. या प्रकरणात ४ सेमी धातूच्या तुकड्याने घात केला.
शिवाय या तुकड्याला वेगही होता. हाच तुकडा वेगात शरिरात पुढे गेला असता तर पित्ताशय नळीला फोडले असते. यातून आकाशच्या जीवावर बेतले असते. लॅप्रोस्कोपीच्या सहाय्याने हा तुकडा पुन्हा काढण्यात आला आहे.
एक्सरे (X-ray) आणि सीटीस्कॅनिंगव्दारे (CT scan) अनोळखी तुकडा शरिरात गेला असल्याचे त्वरीत समजले असल्याचे केईएम रुग्णालय अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले. लवकरच उपचार झाल्याने यातील गुंतागुंत टळली असल्याचे डॉ. देशमुख यांनी स्पष्ट केले.
आकाश चौधरी हा उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यातील असून गेल्या तीन वर्षापासून मुंबईत (Mumbai) राहतो. यकृतापर्यंत पोहचलेला तुकडा यशस्वीपणे काढला असला तरी या दिवसात कामावर न गेल्याने न मिळणाऱ्या पगाराची काळजी त्याला लागली असल्याचे आकाश म्हणाला.