वैद्यकीय तज्ज्ञांचे आवाहन
Twitter: @maharashtracity
मुंबई: चीनमध्ये सध्या बीएफ.७ या नव्या कोरोना विषाणूचा संसर्ग सुरु झाला असून या पार्श्वभूमीवर देशात तसेच राज्यात सावधगिरी पाळण्याच्या सुचना देण्यात येत आहेत. चीनमध्ये वाढत्या नव्या व्हेरियंटच्या घटनांमुळे बुधवारी कोरोनावर केंद्र सरकारची उच्चस्तरीय बैठक झाली.
केंद्र सरकारने सध्या कोणतेही निर्बंध जाहीर केलेले नसले तरी खबरदारी घेण्याच्या सुचना सर्व राज्यांना देण्यात आल्या आहेत. यात गर्दीच्या ठिकाणी लोकांना मास्क वापरणे तसेच बूस्टर डोस घेण्यास आवाहन केले आहे. अमेरिकेसह चीनमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे रुग्ण वाढत आहेत. त्यात चीनचे नवीन वर्ष जानेवारी महिन्यात असून डिसेंबर अखेरपासून फेब्रुवारीपर्यंत व्हेरियंटचा प्रसार वाढत असल्याचे अनुभव सांगत आहे.
दरम्यान, सध्या आंतरराष्ट्रीय सीमा खुल्या असून नवा व्हेरियंटच्या वाढीमुळे चिंता वाढण्याची शक्यता असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगत आहेत. नव्या व्हेरियंटची प्रसार क्षमता एकाच वेळी १८ जणांना बाधित करण्याची क्षमता याकडे तज्ज्ञ लक्ष ठेवून आहेत. मात्र, राज्यात लसीकरण झाले असून हर्ड इम्युनिटी ही तयार झाली आहे. मात्र सावधगिरी म्हणून गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याची गरज असल्याचे तज्ज्ञ सुचवित आहेत.
तसेच ज्येष्ठ नागरिक आणि जोखमीच्या आजाराच्या रुग्णांनी बुस्टर डोस घेण्याबाबत तज्ज्ञ सुचवित आहेत. दरम्यान, सरकारकडून इशारा देण्यात आला असून कोविड पॉझिटिव्ह रुग्णांचे जिनोम सिक्वेसिंग करण्याच्या सुचना देण्यात येत आहेत. तसेच जिनोम सिक्वेसिंगसाठी सर्व प्रयोगशाळांना सुचना देण्यात आल्या आहेत. सर्दी, खोकला, ताप असे आजार असल्यास मास्क घालावे आणि राहिलेल्यांनी बुस्टर डोस घेण्याची आवश्यकता असल्याचे खासगी कोविड-१९ रुग्णालयाचे समन्वयक डॉ. गौतम भन्साळी यांनी सांगितले.