@maharashtracity
मुंबई: वायू विसावदिया या नऊ महिन्याच्या बाळावर नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी रूग्णालयात (Nanavati Max Super Speciality Hospital) विसंगत स्थितीत यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. अशी प्रकरणे आजपावेतो जगात पाच पेक्षा कमी नोंदविण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.
या प्रकरणात वायू विसावदिया हा सहा दिवसांचा असतानाच त्याला बायलरी अट्रेसिया म्हणजे जन्मतः पित्तनलिका अजिबात नसल्याचे स्पष्ट झाले. हा कमीपणा क्वचित आढळून येतो. दोन आठवड्यांत त्याच्यावर आतडे यकृताला जोडण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्याने त्याला काविळ, कोग्युलोपथी, असेटिस म्हणजे पोटात द्रव साचणे आणि वाढ न होणे यासह यकृत संबंधित आजार जडले.
यातून वायूच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या स्थितीसाठी यकृतारोपण करणे हाच कायमस्वरूपी उपाय असल्यामुळे, कुटुंबियांनी बालरूग्णांच्या यकृतारोपणाचे (lever transplant) कौशल्य असलेल्या नानावटी मॅक्स रूग्णालयातील तज्ञांचा सल्ला घेतला. वायूचे आईवडिल यकृत दान करण्यास योग्य नसल्याचे स्पष्ट झाले. मात्र त्याची काकी विधी विसावदिया यकृत दानासाठी समोर आल्या.
विधी यांचा रक्तगट ए पॉझिटिव होता तर वायूचा रक्तगट ओ पॉझिटिव होता. त्यामुळे या तुकडीने एबीओआय यकृतारोपण करण्याचा निर्णय घेतला. वायूला न्युमोनिया झाला आणि विधी यांची कोविड टेस्ट पॉझिटिव आली. अशा प्रकारच्या अनेक कारणांमुळे अनेक वेळा ही शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे हे दोघेही पूर्णपणे बरे झाल्यानंतरच शस्त्रक्रिया करण्याचे निश्चित करण्यात आले.
दरम्यान, वायूच्या अँटी ए अँटीबॉडी टायटर्स जास्त प्रमाणात असल्याचे आढळले. ९ महिन्यांच्या अगदी लहान वयातच रक्तगट ए विरूद्ध अँटी बॉडीज तयार झाल्याचे आढळल्याचे निरीक्षण मांडण्यात आले. साधारणतः लहान मुले २४ महिने झाल्यानंतर त्यांचा रक्तगट परिपक्व होतो. त्यामुळे कोणतीही पूर्व तयारी न करता एबीओआय यकृतारोपण करण्यास योग्य ठरतात. नऊ महिन्यांच्या वयात एखादे बालक संवेदनशील झाल्याची कोठेही अहवालात नोंद करण्यात आलेली नाही. पश्चिम भारतात प्रथमच अशा दुर्मिळ स्थितीत ९ महिन्यांच्या बालकावर यकृतारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली असल्याचे पेडिअॅट्रिक हेपटोलॉजी डॉ. विभोर बोरकर यांनी सांगितले.
यावर बोलताना डायरेक्टर, ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया डॉ. अनुराग श्रीमाल, यांनी सांगितले की, वायूच्या वैद्यकीय स्थितीमुळे त्याची रोपण शस्त्रक्रिया अतिशय आव्हानात्मक होती. शस्त्रक्रियेच्या ६ तास ३० मिनिटांच्या कालावधीत प्रत्येक अडचण अतिशय उत्तम प्रकारे हाताळण्यात आली असल्याचे डॉ. श्रीमाल म्हणाले. वायूला १० दिवसांच्या आत डिस्चार्ज देता येईल इतकी त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली.