उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची विद्यार्थ्यांसोबत सकारात्मक चर्चा
By सचिन उन्हाळेकर
Twitter : @maharashtracity
मुंबई: उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत सर ज. जी. कला महाविद्यालयातील संपकरी विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींची सोबत आज सायंकाळी मंत्रालयात सकारात्मक बैठक पार पडल्याने उद्या शुक्रवारी संप मागे घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कायम स्वरुपी शिक्षक नसणे, वारंवार शिक्षक बदलत असल्याने अभ्यासक्रमावर परिणाम होणे, वसतिगृह नसणे या अणि अशा असंख्य समस्यांवर तोडगा निघत नसल्याने सर ज. जी. कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवशी निषेध आंदोलन पुकारले होते. त्यानंतर सलग सात दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. मागील आठ दिवसांपासून सर ज. जी. कला महाविद्यालयातील विद्यार्थी वर्गात न बसता महाविद्यालयाच्या आवारात बसून येथेच आपला अभ्यास आणि काम करत आपल्या मागण्यांसाठी आंदोलन (Students on strike) करत आहे. आज गुरुवारी संपाला पाठिंबा दर्शविण्यासाठी सर ज. जी. कला महाविद्यालयातील (Sir J J School of Arts) माजी विद्यार्थीदेखील आंदोलनात सहभागी झाले.
या संपाची गंभीर दखल उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी घेऊन आज संपकरी विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींना मंत्रालयात बोलावून त्यांच्याशी चर्चा केली. मंत्री पाटील यांच्या दालनात ही चर्चा पाऊनतास सुरु होती. बैठकीत विद्यार्थ्यांनी ज्या ज्या समस्या उपस्थित केल्या, त्या सर्व समस्या मंत्री पाटील यांनी व्यवस्थित जाणून घेतल्या. विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी मंत्री पाटील यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद ही मिळाला. त्यामुळे आम्हा विद्यार्थ्यांना एक आधार मिळाला आहे, असे महाविद्यालयातील विद्यार्थी संघटनेचे सरचिटणीस संतोष पारकर यांनी सांगितले.
दरम्यान, सोमवारी उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांना प्रतिसाद न दिल्याने विद्यार्थ्यांमध्ये रोष निर्माण झाला होता. खासदार तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) यांनी मंगळवारी सर ज. जी. कला महाविद्यालयातील संपकरी विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींना मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बोलावून चर्चा केल्यानंतर ही संप मागे घेण्यात आला नव्हता. मात्र, आज मंत्री पाटील यांच्या सोबत झालेल्या चर्चेमुळे एक आशेचा किरण विद्यार्थ्यांना दिसल्याने संप मागे घेण्याची शक्यता ही वर्तविली जात आहे. यासंबंधी उद्याच विद्यार्थ्यांशी संवाद साधून संपाबाबत निर्णय जाहीर करु, असे पारकर यांनी स्पष्ट केले.