संप सुरुच राहणार 

@maharashtracity

By सचिन उन्हाळेकर

मुंबई: उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांतर्फे कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई वा साधे आश्वासन ही न मिळाल्याने सर ज. जी. कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये रोष निर्माण होऊन संप मागे न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे महाविद्यालयातील (Sir J J school of Art) विद्यार्थी संघटनेचे सरचिटणीस संतोष पारकर यांनी सांगितले.

कायम स्वरुपी शिक्षक नसणे, वारंवार शिक्षक बदलत असल्याने अभ्यासक्रमावर परिणाम होणे, वसतिगृह नसणे या अणि अशा असंख्य समस्यांवर तोडगा निघत नसल्याने सर ज. जी. कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी चार दिवसांपासून संप पुकारला आहे. 

दरम्यान, विद्यार्थ्यांनी सोमवारपासून वर्गात उपस्थित रहावे, असे आवाहन महाविद्यालयाच्या प्रशासनातर्फे शुक्रवारी करण्यात आले होते. मात्र महाविद्यालय प्रशासन  केवळ आश्वासने देत असून ठोस कारवाई बाबत कोणतीही स्पष्ट भूमिका घेण्यात नसल्याने आज सोमवारी ही विद्यार्थ्यांचा संप सुरु राहिला.

मागील पाच दिवसांपासून सर ज. जी. कला महाविद्यालयातील विद्यार्थी वर्गात न बसता महाविद्यालयाच्या आवारात बसून येथेच आपला अभ्यास आणि काम करत आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहे. पहिल्या दिवशी निषेध आंदोलन केले तर गेल्या चार दिवसांपासून विद्यार्थ्यांनी संप (students on strike) पुकारला आहे.

सोमवारी ही विद्यार्थ्यांचा संप सुरु होता. सोमवारी सांयकाळी चारच्या सुमारास संपकरी विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधीनी मंत्रालयात जाऊन उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास रस्तोगी यांची भेट घेतली. मात्र या भेटी दरम्यान विद्यार्थ्यांची घोर निराशा झाली. विद्यार्थ्यांनी केलेल्या मागणीवर कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई तर दूर राहिली उलट कुठल्याही मागण्यांवर साधे आश्वासन ही मिळालेले नाही, असे सर ज. जी. कला महाविद्यालयातील (Sir J J school of Art) विद्यार्थी संघटनेचे सरचिटणीस संतोष पारकर यांनी सांगितले. 

सध्या महाविद्यालयातील प्रशासन विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर केवळ आश्वासने देत आहे. त्यात आता उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांनी ही विद्यार्थ्यांच्या मागण्यांना प्रतिसाद न दिल्याने विद्यार्थ्यांमध्ये रोष निर्माण झाल्याने संप मागे घेण्यात येणार नसल्याचे विद्यार्थी संघटनेचे सरचिटणीस पारकर यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here