By सचिन उन्हाळेकर
@maharashtracity
मुंबई: कायम स्वरुपी शिक्षक नसणे, वारंवार शिक्षक बदलत असल्याने अभ्यासक्रमावर परिणाम होणे, वसतिगृह नसणे या अणि अशा असंख्य समस्यांवर तोडगा निघत नसल्याने सर ज. जी. कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी संप पुकारला आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांनी सोमवारपासून वर्गात उपस्थित रहावे, असे आवाहन महाविद्यालयाच्या प्रशासनातर्फे आज करण्यात आले अणि महाविद्यालय प्रशासनाने केलेल्या आवाहनाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही अणि संप मागे घेण्यात आलेला नाही, असे स्पष्ट मत सर ज. जी. कला महाविद्यालयातील (Sir J J school of Art) विद्यार्थी संघटनेचे सरचिटणीस संतोष पारकर यांनी व्यक्त केले आहे.
मागील तीन दिवसांपासून सर ज. जी. कला महाविद्यालयातील विद्यार्थी वर्गात न बसता महाविद्यालयाच्या आवारात बसून येथेच आपला अभ्यास आणि काम करत आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहे. पहिल्या दिवशी निषेध आंदोलन केले तर गेल्या दोन दिवसांपासून विद्यार्थ्यांनी संप (students on strike) पुकारला आहे.
सर ज. जी. कला महाविद्यालयात शिकण्यासाठी ८० टक्के विद्यार्थी हे गाव- खेड्यातून येत असले तरी त्यांना राहण्यासाठी येथे वसतिगृह (Hostel) नसल्याने राहायचे कुठे असा प्रश्न निर्माण होतो. त्यात पुरेसे शिक्षक उपलब्ध नाहीत. जे शिक्षक आहेत ते कायमस्वरूपी नसल्याने अणि शिक्षक (teachers) वारंवार बदलत असल्याने अभ्यासक्रमावर फार परिणाम होत असल्याचे विद्यार्थ्यांचे मत आहे.
महाविद्यालयात रे आर्ट वर्कशॉप च्या इमारतीमध्ये पायाभूत सुविधांचा अभाव असल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. डी – नोव्हा विद्यापीठ (De-Novo University) स्थापन केल्याने भरमसाठ फी वाढ होणार असल्याची भीतीही विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.
यासंबंधी आज विद्यार्थ्यांच्या मागण्यासंदर्भात सर ज. जी. कला महाविद्यालयातील अधिष्ठाता विजय साबळे यांनी विद्यार्थ्यांना लेखी निवेदन देत सोमवारपासून वर्गात हजर रहावे, असे आवाहन केले आहे.
अधिष्ठाता यांनी निवेदनात म्हटले आहे की, डी – नोव्हा विद्यापीठ स्थापन करण्याबाबतची कार्यवाही कला संचालनालय व शासन स्तरावर सुरू आहे. विद्यार्थ्यांना वसतिगृह नाही, याप्रश्नी त्यांनी विद्यार्थ्यांना निवेदनात स्पष्ट केले आहे की, सर ज. जी. कला संस्था मुलांचे वसतिगृहाच्या इमारतीची पुनर्बांधणी प्रक्रिया झाली नसल्याने तसेच विद्यार्थी वसतिगृह हा कला संचालक यांच्या अखत्यारितील विषय असून वसतिगृहाचे काम प्रलंबित आहे.
दरम्यान, सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह यांनी वसतिगृहाच्या इमारतीची पुनर्बांधणी प्रक्रिया सुरू असल्याने विद्यार्थिनीचे प्रवेश या वर्षाकरिता नाकारले आहेत. तरी या संस्थेकडून विद्यार्थ्यांना कार्यालयामार्फत शिफारस पत्राद्वारे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांना इतर वसतिगृह प्रवेशाकरिता शिफारस करून प्रवेश देण्यात आलेले आहेत. तसेच इतर वसतिगृहात निवासाची व्यवस्था करण्याकरिता कला संचालनालय स्तरावर पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे, असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले आहे.
तर शिक्षक भरती प्रक्रिया शासनाच्या अधिन असून AICTE च्या नियमानुसार निर्माण केलेल्या नवीन पदांच्या सेवाप्रवेश नियमांस मान्यतेबाबतचा प्रस्ताव हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे सादर करण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने सद्यस्थितीत पाच विशेष तज्ञ आणि १० अभ्यागत अधिव्याख्याता यांची जुलैपासून तात्पुरत्या स्वरूपात नेमणूक करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची दक्षता घेण्यात येईल, असेही अधिष्ठाता साबळे यांनी निवेदनात म्हटले आहे.
महाविद्यालयात पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीत, या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत अधिष्ठाता साबळे यांनी निवेदनात म्हटले की, सद्यस्थितीत रे आर्ट वर्कशॉप च्या इमारतीचे नूतनीकरणाचे काम सुरू असून ते काम प्रगतीपथावर आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रसाधनगृह, जिमखाना, मुलांचे अणि मुलींची विश्राम खोली संबंधित अडचणी निर्माण झाल्या. त्याबाबत पर्यायी व्यवस्था करण्यात आली होती. तथापि त्यातही काही त्रुटी असल्यास दूर करण्यात येतील. तसेच संगणक कक्षाचे नूतनीकरणाचे काम सुरू आहे. शैक्षणिक दृष्ट्या आवश्यक असलेल्या सॉफ्टवेअरकरिता कला संचालनालयाकडे मागणी केली असून त्याबाबत पाठपुरावा सुरू आहे.
या निवेदनात अधिष्ठाता साबळे यांनी असेही स्पष्ट केले की, प्रथम वर्ष वर्ग उशीराने सुरू झाला आहे आणि संपामुळे त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन वर्गात हजर रहावे, असे आवाहन केले आहे.