शिक्षण विभाग व बायजूस संस्था यांच्यात दावोसमध्ये सामंजस्य करार

@maharashtracity

मुंबई: भारतात खासगी शाळांमध्ये महाग शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांप्रमाणेच मुंबई महापालिकेतील (BMC schools) गरीब समाजघटकातील विद्यार्थ्यांनाही आंतरराष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक कार्य करणारी बायजूस (BYJU’s) या संस्थेमार्फत अत्याधुनिक तंत्रज्ञान आधारित शिक्षण (advance education) देण्यात येणार आहे.

बायजूस संस्था व मुंबई महापालिकेचा शिक्षण विभाग यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे. दावोस (स्वित्झर्लंड) येथे आयोजित जागतिक आर्थिक परिषदेत (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) झालेल्या या करारामुळे मुंबई महापालिकेच्या विद्यार्थ्यांना बायजूस संस्थेचे ‘लर्निंग ऍप’ व इतर सेवा प्रणाली विनामूल्य वापरासाठी उपलब्ध होणार आहेत.

महापालिकेच्या शाळांमध्ये ज्ञानदानाचे कार्य अविरतपणे करणा-या शिक्षकांना देखील बायजूस संस्थेद्वारे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

या सामंजस्य करारप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, अतिरिक्त मुख्य सचिव आशिष सिंह आणि बायजूस संस्थेचे बायजू रविंद्रन हे दावोसमध्ये प्रत्यक्ष उपस्थित होते. तर मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल‌, सह आयुक्त (शिक्षण) अजित कुंभार हे दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले होते, अशी माहिती पालिका शिक्षण खात्याने दिली आहे.

मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी मोफत व दर्जेदार शिक्षण मिळण्याकरिता गेल्या काही वर्षात पालिका शिक्षण खात्यामार्फत व्हर्च्युअल क्लासरूम (Virtual classroom), डिजीटल क्लासरूम (Digital classroom), टॅब, कम्प्युटर लॅब, सायन्स लॅब, ऍस्ट्रॉनॉमी लॅब, संगीत- कला- क्रीडा अशा विविध उपक्रमाद्वारे अध्ययन व अध्यापन अविरतपणे करण्यात येत आहे.

याच शृंखलेत बायजूस या संस्थेसोबतच्या सामंजस्य कराराच्या निमित्ताने आणखी एक पुढचे पाऊल उचलण्यात आले आहे. यामुळे आता विद्यार्थ्यांना टॅब, मोबाईल, संगणकाच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण सहज आणि सोप्या पद्धतीने उपलब्ध होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here