कुलाबा डेपोत माघार
संपाची टांगती तलवार कायम
@maharashtracity
मुंबई: बेस्ट उपक्रमाच्या (BEST undertaking) परिवहन विभागात भाडे तत्वावर बसगाड्या चालविणाऱ्या एम्. पी. ग्रूप कंत्राटदाराने कंत्राटी बस चालकांचे वेतन, पी. एफ.चे पैसे न दिल्याने मंगळवारी कुलाबा, वांद्रे, कुर्ला, वडाळा व विक्रोळी या पाच बस डेपोमधील बस चालकांनी संप (strike by bus drivers) केला होता. हा संप कुलाबा डेपोतील कर्मचाऱ्यांनी २५ मे पर्यन्त मागे घेतला आहे. तर उर्वरित चार डेपोत संप सुरूच राहणार आहे. बेस्टमधील या संपामुळे पाच डेपोतील बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे खूप हाल झाले.
कुलाबा बस डेपोमधील कर्मचाऱ्यांनी १८ मे पर्यन्त थकीत वेतन, पी.एफ. चे पैसे न दिल्यास १९ मे पासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला होता. मात्र, कंत्राटदाराने काही कर्मचाऱ्यांचे वेतन अदा केले असून उर्वरित कर्मचाऱ्यांना २५ मेपर्यन्त थकीत वेतन व पी.एफ. रक्कम देण्याचे आश्वासन दिल्याने कुलाबा डेपोमधील कर्मचाऱ्यांनी संप तूर्तास मागे घेतला आहे.
मात्र २५ मे पर्यन्त कंत्राटदाराने कर्मचाऱ्यांनी वेतन व पी.एफ.चे पैसे न दिल्यास या डेपोत संपाची टांगती तलवार कायम राहील.
बेस्ट प्रशासनाने मुंबईकरांना अधिक चांगली एसीची गारेगार बस सेवा देण्यासाठी भाडे तत्त्वावरील ३८६ बसगाड्या कंत्राटी पद्धतीने बेस्टच्या ताफ्यात घेतल्या. मात्र, आता या बस पुरवठादार कंत्राटदारापैकी एक पी. एम. ग्रुपने त्यांच्या कुलाबा, वांद्रे, विक्रोळी, वडाळा व कुर्ला येथील बस गाड्यांवरील चालकांना त्यांचे वेतन व पी.एफ.चे पैसे न दिल्याने या पाच डेपोमधील कर्मचाऱ्यांनी मंगळवारी अचानक संप पुकारला व प्रवाशांना वेठीस धरले होते.
यापूर्वीही याच विषयावरून २१ व २२ एप्रिल रोजी बस चालकांनी अचानकपणे संप केला होता. त्यावेळी कंत्राटदाराने कर्मचाऱ्यांचे पैसे देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्याची प्रतिपूर्ती न केल्याने या बस चालकांनी अखेर पुन्हा एकदा मंगळवारी पाच डेपोत संप केला होता.
दरम्यान, कंत्राटदारामार्फत चालविण्यात येणाऱ्या ३०८ बसगाड्या चालकांअभावी रस्त्यावर न धावता डेपोतच उभ्या राहिल्या. तर बेस्ट प्रशासनाने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी विविध बस डेपोमधून ११३ बसगाड्यांची पर्यायी व्यवस्था केल्याचे बेस्ट प्रशासनाकडून सांगण्यात आले.