@maharashtracity
मुंबई: ओमायक्रॉन (Omicron) या कोविड विषाणूच्या प्रसारासह एकूणच कोविडबाधित रुग्णांची संख्या वाढीस लागल्याने राज्य सरकार अतिदक्ष झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे पर्यटन, पर्यावरण मंत्री व मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) मुख्यालयात आज आढावा बैठक घेतली.
त्यानंतर महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल (BMC Commissioner IS Chahal) यांनी देखील महानगरपालिका प्रशासनाची दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक घेवून विविध निर्देश दिले आहेत. प्रामुख्याने नववर्ष स्वागताच्या (New Year welcome parties) पार्श्वभूमीवर दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर प्रशासनाची करडी नजर राहणार असून त्यादृष्टिने विविध सूचना देण्यात आल्या आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोविड बाधितांच्या (covid patients) संख्येत मागील आठवडाभरात वेगाने वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री आदित्य ठाकरे हे आज सकाळी महानगरपालिका मुख्यालयात आढावा बैठकीसाठी दाखल झाले.
महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांची या बैठकीस उपस्थिती होती.
महानगरपालिका आयुक्त डॉ. चहल म्हणाले की, ओमायक्रॉन विषाणूचा प्रसार वेगाने होत असून एकूणच कोविड बाधित रुग्णांची संख्याही जलदगतीने वाढत आहे. केंद्र व राज्य सरकारने सावधानतेचा इशारा दिल्यानंतर नव्याने कोविड प्रतिबंधात्मक निर्देश देण्यात आले आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा (Third wave of covid) सामना करण्यासाठी पूर्ण तयारी केली असून खासगी रुग्णालये (Private Hospitals) देखील सुसज्ज होत आहेत. प्रशासनाने रुग्ण संख्या आटोक्यात ठेवण्याच्या दृष्टीने सर्वत्र गर्दी रोखण्यावर जोर दिला आहे.
विशेषतः लग्न सोहळ्यांवर (marriages) आणि नववर्ष स्वागत कार्यक्रमांवर निर्बंध आणले असले तरी मागील आठवडाभरात रुग्णसंख्या वेगाने वाढली असून ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे दक्षता म्हणून काही बाबी प्राधान्याने करावयाच्या आहेत, असे सांगून डॉ. चहल यांनी निर्देश दिले. ते पुढीलप्रमाणेः
नववर्ष स्वागताचे कार्यक्रम / समारंभ / पार्टी आयोजित न करण्याच्या सूचना यापूर्वीच देण्यात आल्या आहेत. हॉटेल्स्, उपहारगृह यांच्यासह विविध आस्थापनांना उपस्थितीच्या मर्यादा ठरवून देण्यात आल्या आहेत.
त्याचे योग्यरीतीने पालन होते आहे, यावर देखरेख ठेवण्यासाठी सर्व प्रशासकीय विभाग कार्यालयांनी तातडीने भरारी पथकांची नेमणूक करावी. स्थानिक पोलीस उपायुक्तांशी समन्वय साधून या पथकांमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांचा देखील समावेश करावा.
नववर्ष स्वागत प्रतिबंधात्मक आदेश तसेच कोविड प्रतिबंधात्मक सूचनांचे उल्लंघन करताना आढळणाऱ्या हॉटेल्स्, उपहारगृहांवर सक्त कारवाई करावी.
सर्व सहायक आयुक्तांनी आपापल्या अखत्यारितील हॉटेल्स्, उपहारगृहं यांचे दैनंदिन फुटेज तपासून उपस्थितीचे नियम पाळले जात असल्याची खातरजमा करावी.
मालाड येथील कोविड उपचार केंद्र (Covid Center) हे लहान मुलांवर उपचारांसाठी महत्त्वाचे आहे. या केंद्रासह कांजूरमार्ग येथे उभारलेले कोविड उपचार केंद्र देखील लवकरात लवकर कार्यान्वित करावे.
दुबईमधून (Dubai) येणाऱ्या आंतरराष्ट्रीय हवाई प्रवाशांना सक्तीने सात दिवस गृह विलगीकरण (Home Quarantine) करण्याचे निर्देश व त्याअनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीबाबत महानगरपालिका प्रशासनाने दिनांक २४ डिसेंबर २०२१ रोजी आदेश दिले आहेत. या आदेशांमध्ये आता फक्त दुबईऐवजी संपूर्ण संयुक्त अरब अमिराती (UAE) देशांचा समावेश करण्यात आला आहे.
तसेच संयुक्त अरब अमिराती देशांमधून मुंबईत येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला विमानतळावर आगमनप्रसंगी आरटीपीसीआर (On Arrival RT-PCR testing) चाचणी करावी लागेल. या चाचणीच्या अहवालासापेक्ष व प्रचलित नियमानुसार संबंधित प्रवाशांचे विलगीकरण ठरविण्यात येईल.
हवाईमार्गे मुंबईत येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांमधून, ज्या बाधितांना लक्षणे नाहीत (Asymptomatic) आणि औषधोपचाराची देखील गरज भासत नाही, अशा रुग्णांसाठी वांद्रे-कुर्ला संकुल (BKC) व गोरेगावातील नेस्को (Nesco Covid Center) या दोन्ही कोविड उपचार केंद्रामध्ये प्रत्येकी ५०० रूग्णशय्यांची स्वतंत्र विलगीकरण व्यवस्था कार्यान्वित करावी.
एसिम्प्टोमॅटिक रुग्णांना तेथे निशुल्क विलगीकरणात राहता येईल. जे रुग्ण सशुल्क विलगीकरण व्यवस्थेसाठी तयार असतील, त्यांना निर्देशित हॉटेल्स्मध्ये राहण्याची परवानगी देण्यात येईल. या उपाययोजनेमुळे रुग्णालयांमधील रुग्णशय्या विनाकारण अडकून राहणार नाहीत व वैद्यकीय सेवेवरचा ताणदेखील कमी होईल.
विमानतळावर, रॅपिड टेस्टमध्ये (Rapid Test) बाधित आढळलेल्या रुग्णांची नियमित आरटीपीसीआर चाचणी करावी. ती चाचणी निगेटिव्ह असेल तर प्रचलित नियमानुसार विलगीकरणाची कार्यवाही करावी.
जर चाचणी पॉजिटिव्ह आली तर त्या रुग्णास प्रचलित नियमानुसार विलगीकरण अथवा रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घ्यावा. तसेच नियमित आरटीपीसीआर चाचणीचेच नमुने जनुकीय सूत्रनिर्धारण तपासणीसाठी (Genome Sequencing) पाठवावे.
प्रत्येक विभाग कार्यालयाच्या हद्दीमध्ये, कोविड बाधितांच्या विलगीकरणासाठी किमान ५०० व्यक्ती क्षमतेचे कोविड काळजी केंद्र (सीसीसी २) लवकरात लवकर कार्यान्वित करावेत.
सर्व विभाग कार्यालयांमधील विभाग नियंत्रण कक्ष (Ward War Room) मध्ये येत्या दोन महिन्यांसाठी प्रशिक्षणार्थी डॉक्टर अतिरिक्त संख्येने नेमण्यात येणार आहेत. गृह विलगीकरणात राहत असलेल्या रुग्ण व व्यक्तींचा पाठपुरावा करण्यासह इतर वैद्यकीय सेवांसाठी या प्रशिक्षणार्थींच्या सेवा उपयोगात येतील.
सर्व रुग्णालये आणि कोविड उपचार केंद्रामधील मनुष्यबळ, संयंत्रे व इतर यंत्रणा, औषधसाठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत किंवा कसे, याचा आढावा घेवून त्यामध्ये कमतरता राहणार नाही, याची खात्री करावी.