शिवसेना उपनेते मनोज जामसुतकर यांची मागणी

@maharashtracity

मुंबई: ‘बीडीडी’ चाळींच्या धर्तीवर मुंबईतील ‘बीआयटी’ चाळींचाही पुनर्विकास करून रहिवाशांना किमान ५०० चौरस फुटांची घरे देण्यात यावीत, अशी मागणी शिवसेनेचे उपनेते मनोज जामसुतकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) व पालिका आयुक्त इकबाल चहल यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

मुंबईत माझगाव, ताडवाडी येथे – १६,
लव्हलेन – ३, चिंचबंदर – ७, मांडवी, कोळीवाडा – ५, मुंबई सेंट्रल – १९, आग्रीपाडा – २४, परळ – ६ आदी विविध ठिकाणी बीआयटी चाळी आहेत. या चाळी ७० – १०० वर्षे जुन्या आहेत. अनेक चाळी एक मजली, दुमजली आहेत. तर काही चाळी धोकादायक स्थितीत असून मोडकळीस आल्या आहेत. या चाळीत पोलीस, पालिका कर्मचारी व भाडेकरू असे हजारो लोक जुन्या बीआयटी चाळीत जीव मुठीत धरून राहत आहेत. माझगाव ताडवाडी बीआयटी चाळ (BIT Chawl) क्रमांक १४, १५ व १६ या इमारतीमधील घरे धोकादायक (dilapidated Chawl) स्थितीत असल्याने २२० घरातील लोकांना ६ वर्षांपूर्वीच माहुल येथे स्थलांतरित करण्यात आले आहे, अशी माहिती मनोज जामसुतकर (Manoj Jamsutkar) यांनी दिली.

मुंबईतील वरळी, नायगाव व डिलाईल रोड येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाबाबत राज्य शासनाने धोरणात्मक निर्णय घेतला. त्यानुसार, म्हाडामार्फत या चाळींचा पुनर्विकास होत आहे. त्यामुळे तेथील भाडेकरूंना मालकी हक्काची ५०० चौ. फुटांची घरे मोफत मिळणार आहेत.

तसेच, वर्षानुवर्षे धोकादायक चाळीत राहणाऱ्या पोलीस बांधवांना १५ लाखात मालकी हक्काची घरे मिळणार आहेत. त्याच धर्तीवर मुंबईतील बीआयटी चाळींच्या पुनर्विकासाठी धोरणात्मक निर्णय लागू करावा व या चाळींचा पुनर्विकास करावा, जेणेकरून हजारो भाडेकरूंना व पालिका कर्मचाऱ्यांना ५०० चौ. फुटाची मालकी हक्काची मोफत घरे मिळतील. तसेच, बीआयटी चाळीतील पोलिसांनाही मालकी हक्काची घरे मिळू शकतील, असे मनोज जामसुतकर यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here