कस्तुरबातील अतिदक्षता विभागात पाच रुग्ण 

एक रुग्ण वेंटिलेटरवर

@maharashtracity

मुंबई: मुंबई शहर व उपनगरात ८ ठिकाणी सध्या गोवरचा प्रादुर्भाव वाढला आहे. आतापर्यंत गोवर बाधित सात लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. कस्तुरबा रुग्णालयातील दाखल ६१ रुग्णांपैकी पाच रुग्णांवर अतिदक्षता (ICU) विभागात तातडीने उपचार सुरू आहेत. तर, एक रुग्ण सध्या व्हेंटिलेटरवर आहे. 

ज्या सात संशयित रुग्णांचा मृत्यू झाला तो नेमका गोवरमुळे की आणखी कोणत्या कारणामुळे याची माहिती येत्या दोन – तीन दिवसात अहवाल प्राप्त झाल्यावर समोर येईल, अशी माहिती महापालिकेच्या (BMC) कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली आहे.

मुंबईत गेल्या दोन वर्षांपासून पिडणाऱ्या व घातक अशा कोरोनावर (corona) नियंत्रण आल्याने मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून गोवरने शहर व उपनगरातील झोपडपट्टीत डोके वर काढले आहे. आतापर्यंत मुंबईत गोवरबाधित १४२ रुग्णांची नोंद झाली आहे. 

कस्तुरबा रुग्णालयात (Kasturba Hospital) गोवर आजारावर उपचार करण्यासाठी तीन कक्ष तयार करण्यात आले आहेत. सध्या ६१ रुग्णांना कस्तुरबा रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी पाच रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत. तर एका रुग्णाला वेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. गोवर रुग्णांची संख्या पाहता गोवंडी शताब्दी रुग्णालयात (Shatabadi Hospital) १० बेड्स वाढविण्यात आले आहेत. शिवाय गोवंडीतील मॅटर्निटी होममध्येही रुग्णांना दाखल करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 

गोवरचे आठ हॉटस्पॉट

शहर व उपनगरात आठ ठिकाणी गोवरचे ‘हॉटस्पॉट’ तयार झाले आहेत. यामध्ये, सर्वाधिक ४४ रुग्ण गोवंडी परिसरात आढळून आले आहेत. त्यापाठोपाठ कुर्ला विभागात – २९, मालाड – १४, धारावी – १२, वडाळा, अँटॉप हिल विभाग – १२, वांद्रे -११, चेंबूर – ६ आणि भायखळा येथे ५ रुग्ण आढळून आले आहेत. गोवर बाधित रुग्णांची संख्या व माहिती पाहता पूर्व उपनगरात सर्वाधिक – ७९, शहर भागात -२९ तर पश्चिम उपनगरात – २५  रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे मुंबई महापालिका आरोग्य खाते गोवरला हद्दपार करण्यासाठी चांगलेच कामाला लागले आहे. 

वास्तविक, मुंबईत गेल्या सप्टेंबर- ऑक्टोबर महिन्यापासून गोवर आजाराचा संसर्ग वाढल्याचे आढळून आले आहे. सर्वाधिक रुग्ण गोवंडीतील आहेत. गोवंडी परिसरात १ लाख १४ हजार १५७ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. या ठिकाणी अतिरिक्त लसीकरण सत्रामध्ये १,२६१ मुलांचे आणि गरोदर महिलांचे लसीकरण करण्यात आले आहे. तर मुंबईत आतापर्यंत १० लाख ९२ हजार ३९१ घरांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे.

मुंबईत आतापर्यंत एकूण १४२ गोवरचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील एकट्या गोवंडीत ४४ रुग्ण आहेत. मुंबईत अतिरिक्त सत्रात ५९७२ मुलांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. या विभागात केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या तीन सदस्य असलेली टीम विभागवार भेट देत आहे.

त्या’ २० हजार मुलांच्या लसीकरणावर भर देणार 

मुंबईत ० ते २ वयोगटातील बालकांचे पालिकेच्या आरोग्य विभागाने सर्वेक्षण केले आहे. यात २० हजार मुलांचे लसीकरण राहिले आहे. काहींनी एकच डोस घेतला आहे. तर काहींनी अद्यापही लस घेतलेली नाही. त्यामुळे अशा २० हजार मुलांवर पालिकेने लक्ष केंद्रित केले जाणार असून या सर्वांचे लसीकरण (vaccination) केले जाणार आहे. त्यासाठी अतिरिक्त कॅम्प आयोजित करण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here