X : @Rav2Sachin

मुंबई: मुंबई महापालिकेत महाराष्ट्र सेक्युरिटी बोर्डाच्या (Maharashtra Security Board) ५०० सुरक्षा रक्षकांच्या पदांची भरती केली जात आहे. ही कंत्राटी पदे केवळ एक वर्षाच्या मुदतीकरीता असतील. या व्यतिरिक्त मुंबई महापालिका (BMC) येत्या काही महिन्यात सुरक्षा रक्षकांची भरती करणार असल्याचे पालिकेच्या सुरक्षा रक्षक विभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी maharashtra.city शी बोलताना स्पष्ट केले आहे.

महापालिकेतील सुरक्षा रक्षकांच्या रिक्त जागेपैकी किमान अर्ध्या रिक्त जागा भरण्यात याव्यात. त्यानुसार, भरती करण्याचे आदेश २०१८ रोजी मुंबई महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अजोय मेहता (IAS Ajoy Mehta) यांनी दिले होते. मात्र, त्यानंतरही भरती करण्यात आली नव्हती. त्यानंतर तत्कालीन अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी (IAS Suresh Kakani) यांनी ८४९ सुरक्षा रक्षक पदांसाठी भरती प्रक्रियेची (Recruitment of security guards) कार्यवाही करण्यास सांगितले होते. मात्र, तेव्हाही भरती करण्यात आली नाही.  

सद्यस्थितीत सुरक्षा रक्षकांची एकूण 3809 मंजूर पदे आहेत. पण यामध्ये कार्यरत सुरक्षा रक्षक 1825 असून एकूण रीक्त सुरक्षा रक्षक पदांची संख्या 1984 आहे. मनुष्यबळ कमतरतेचा परिणाम महापालिकेच्या सुरक्षा व्यवस्थेवर होत आहे. डिसेंबर २०२२ मध्ये मुंबई महापालिका मुख्यालयात शिवसेनेचे कार्यालय (Shiv Sena party office) ताब्यात घेण्यासाठी शिंदे – उद्धव गट एकमेकांना भिडल्याच्या घटनेत सुरक्षा रक्षकांची कमतरता खास करुन दिसली होती. मुंबई महापालिकेच्या सुरक्षा विभागातील सुरक्षा कर्मचारी हे मुंबई महापालिकेच्या वार्ड इमारती, रुग्णालये, मालमत्ता, धरणे, जलाशय, जलवाहिन्या यांचे संरक्षण करण्याचे कामकाज करत असततात, मात्र, मनुष्यबळ कमतरतेचा परिणाम होत असल्याचे सुरक्षा रक्षक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

कोणाची सुट्टी असल्यास किंवा कोणी रजेवर गेल्यास प्रत्येक शिफ्टमधील मनुष्यबळाची संख्या आणखी कमी होते. त्यात अलिकडेच लिपिक पदासाठी सुरक्षा रक्षकांची निवड केली गेल्याने आणि येत्या वर्षभरात निवृत्त होणाऱ्या सुरक्षा रक्षकांची संख्या पाहता सुरक्षा रक्षक विभागात सुमारे ३५ ते ४० टक्के मनुष्यबळाची (manpower) कमतरता होणार आहे. सद्यस्थितीत २५ टक्के मनुष्यबळाची कमतरता आहे. ही कमतरता भरुन काढण्यासाठी सुरक्षा रक्षक विभागात महाराष्ट्र सेक्युरीटी फोर्स विभागातील सुरक्षा रक्षकांना घेतले जात आहे. ज्या – ज्या ठिकाणी सुरक्षा रक्षकांची कमतरता आहे, त्या – त्या ठिकाणी महाराष्ट्र सेक्युरीटी बोर्ड विभागातील सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. हे सर्व कंत्राटी असणार आहेत. यातील काही सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, अशी माहिती सुरक्षा रक्षक अधिकाऱ्यांनी दिली.  

दरम्यान, महापालिका विभागातील सुरक्षा रक्षकांच्या 720 जागा लवकरच भरल्या जाणार असून यासंबंधातील सर्व प्रक्रियेचे कामकाज सुरु झाले आहे. येत्या काही महिन्यांत या भरती प्रक्रियेचे कामकाज पूर्ण होईल. महाराष्ट्र सेक्युरीटी फोर्स विभागातील सुरक्षा रक्षकांची नियुक्ती कंत्राटी पद्धतीची असेल, ही नियुक्ती एक वर्षाच्या कालावधीसाठी असणार आहे. महाराष्ट्र सेक्युरीटी फोर्स विभागातील सुरक्षा रक्षकांच्या नियुक्तीमुळे पालिकेच्या सुरक्षा रक्षकांच्या भरती प्रक्रियेवर कोणताही परिणाम होणार नाही, असे सुरक्षा रक्षक विभागाचे प्रमुख अधिकारी अजित तावडे यांनी maharashtra.city शी बोलताना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here