Twitter : @maharashtracity
मुंबई :
मुंबईत नोंद झालेल्या साथरोगाची आकडेवारी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. १ ते २० ऑगस्ट या कालावधीतील ही आकडेवारी असून या साप्ताहिक अहवालनुसार पुन्हा मलेरियाचा जोर दिसून येत आहे. ऑगस्टच्या आतापर्यंतच्या रुग्णांच्या आकडेवारीत मलेरियाचे रुग्ण अधिक तर गॅस्ट्रो आणि डेंग्यू साथरोगाचे आव्हान दिसून येत आहे.
दरम्यान, ऑगस्ट महिन्यात हिवतापाचे ७०४, लेप्टो २१७, डेंग्यू ४१५, गॅस्ट्रो ६६०, हेपेटायटिस ४८, चिकनगुनिया १४ तर एच१एन१ १०० असे रुग्ण आढळून आले आहेत. जुलै महिन्यात मात्र हिवतापाचे ७२१, लेप्टो ४१३, डेंग्यू ६८५, गॅस्ट्रो १७६७, हेपेटायटिस १४४, चिकनगुनिया २७ तर एच१एन१चे १०६ असे रुग्ण महिनाभरात नोंद करण्यात आले होते. जून, जुलै आणि ऑगस्ट या महिन्याच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यातील हिवताप रुग्णांची आकडेवारी वीस दिवसात बरीच वाढली आहे. आरोग्य विभागाच्या निरीक्षणानुसार लेप्टो, गॅस्ट्रो, चिकनगुनिया आणि एच१एन१ च्या रुग्णसंख्येत घट झालेली दिसून येत आहे. तर रिपोर्टिंग २२ वरुन ८८० पर्यंत वाढल्याने अहवालातील रुग्णसंख्येमध्ये वाढ दिसून येत आहे. यात सर्व रुग्णालयांतील, दवाखाने, लॅब्समधील माहितीची समावेश असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.