रुग्णालय परिसरात आवाजाची पातळी ओलांडण्याचा गुन्हा

रात्री-अपरात्रीच्या आवाजाने रुग्ण-डॉक्टरांना त्रास

Twitter: @maharashtracity

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयाच्या रेडिओथेरपीसाठी नव्या इमारतीचे काम काही महिन्यांपासून सुरु आहे. मात्र या विकासकामाचा त्रास रुग्ण तसेच डॉक्टरांना होत आहे. या ठिकाणी मध्यरात्री उलटून गेल्यावरही आवाजाची पातळी ओलांडून ड्रिलिंग खोदकाम सुरु असते. डॉक्टरांकडून या बाबतची तक्रार करुन देखील त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या आवाजामुळे डॉक्टर-रुग्णांची मानसिक स्थिती बिघडण्याची वेळ आली असून ही समस्या आता नेमकी कोण सोडवणार असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

इमारत उभारणीच्या कामासाठी नायर रुग्णालय परिसरात सकाळी ९  ते मध्यरात्रौ उपरांत २ वाजेपर्यंत मशीनने ड्रिलिंग खोदकाम सुरु असल्याचे डॉक्टर सांगतात. त्यामुळे रात्रीच्या शांततेत खोदकामाचा आवाज मनःशांती हिरावणारा ठरतो. या आवाजाची तीव्रता डेसीबल ओलांडणारी असते. याचा परिणाम डॉक्टरांच्या आरोग्यावर होत असून रुग्णांना देखील होत आहे. तसेच कानठळ्या बसणाऱ्या त्या आवाजामुळे ऐकू न येणे, अभ्यासात लक्ष न लागणे, झोप न येणे अशा तक्रारी निवासी डॉक्टरांनी केल्या आहेत. 

निवासी डॉक्टर्स शिफ्टनुसार रुग्णालयात रुग्णांना सेवा देतात. दिवसभर काम केल्यानंतर या मशीन आणि खोदकामानिमित्त होणाऱ्या आवाजामुळे निवासी डॉक्टरांना हवीतशी झोप ही घेता येत नाही. शिवाय, अनेक डॉक्टर्स रात्री वाचनालयात बसून अभ्यास करतात पण, त्यातही त्यांचे लक्ष लागत नाही. हे काम निवासी वसतीगृहाच्याच बाजूला होत असल्याने सर्व निवासी डॉक्टरांना परिसरात वाढलेल्या ध्वनी प्रदूषणाचा त्रास होत आहे. 

दरम्यान, रुग्णालय परिसरात काम करण्यासाठी किंवा कोणत्याही ठिकाणी काम करण्यासाठी मशीनचा आवाज ८५ डेसिबल एवढा असायला हवा. मात्र, नायर रुग्णालय परिसरातील खोदकामाच्या आवाजाची पातळी १०० डेसिबल पेक्षा जास्त असते. याविषयी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रवीण राठी यांच्याशी निवासी डॉक्टरांशी संघटना मार्डने पत्रव्यवहार करुन निवेदन दिले आहे. या निवेदनात हे काम सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सुरु ठेवावे, यासह अभ्यासासाठी मध्यवर्ती वाचनालय २४ तास सुरु ठेवावे अशी मागणी केली आहे.

“हे फक्त बांधकाम गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु आहे. या खोदकामाच्या वेळी होणारा आवाज सहन न होणारा आहे. सकाळी ९ ते ५ या वेळेस हे खोदकाम केले जाऊ शकते. पण, रात्री दोन वाजेपर्यंत हे काम सुरुच असते. खोदकाम करणाऱ्या लोकांनाही आम्ही अनेकदा थांबवण्याचा प्रयत्न केला पण, रात्री ते थांबत नाही. अधिष्ठात्यांना याविषयी पत्रव्यवहार झाला आहे.”

डॉ. वर्धमान रोटे, मार्ड अध्यक्ष, नायर रुग्णालय

नव्या इमारतीच्या बांधकामातुन होणारा आवाज जास्त आहे. याविषयी, पालिकेच्या एचआयसी विभागाकडे विचारणा केली आहे. शिवाय, मध्यवर्ती वाचनालय ही २४ तास सुरु करण्यात आले आहे. हे बांधकाम काही काळ थांबवता येईल का किंवा आवाजची पातळी कमी करता येईल का यावर एचआयसी विभागाशी संपर्क करुन माहिती घेतली जाईल.

– डॉ. प्रवीण राठी, अधिष्ठाता, नायर रुग्णालय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here