मुंबईत पावसाची ‘विश्रांती’

@maharashtracity

मुंबई: मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह अतिवृष्टी होणार असल्याचे सांगत हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’ चा इशारा मुंबईकरांना दिला. मात्र प्रत्यक्षात आज सकाळी ११ वाजता एकच जोरदार सर येऊन गेली आणि त्यानंतर दिवसभर पावसाने ‘विश्रांती’ घेतल्याचे निदर्शनास आले. गेल्या रविवारपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाच्या फटक्यापासून मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला.

हवामान खात्याने गुरुवारीसुद्धा जोरदार ते अति जोरदार पाऊस पडण्याची व प्रति ताशी ४० – ५० किमी वेगाने वारे वाहणार असल्याचा पूर्व संदेश दिला होता. मात्र प्रत्यक्षात गुरुवारी दुपारनंतरही पावसाने थोडीशी विश्रांती घेतली होती. पालिकेने शुक्रवारी मुंबईत ‘रेड अलर्ट’ चे हवामान खात्याचे फर्मान समोर ठेवून मुंबईकरांना ‘रेड अलर्ट’ चा इशारा देत आवश्यकता नसेल तर घराच्या बाहेर पडू नये, असे आवाहन पालिकेने केले होते. त्यामुळे आता हवामान खात्याच्या पूर्व इशाऱ्याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

दरम्यान, आज सकाळी ८ ते सायंकाळी ६ या कालावधीत मुंबई शहर भागात फक्त १ मिमी, पश्चिम उपनगरे भागात ३ मिमी तर पूर्व उपनगरे भागात ४ मिमी इतक्या कमी पावसाची नोंद झाली आहे. यावरून मुंबईत पावसाचा किती जोर होता हे सिद्ध होते.

त्यातही हवामान खात्याने पुढील २४ तासात शहर व उपनगरे येथील काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची तर काही ठिकाणी अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. एवढेच नव्हे तर जोरदार ते अति जोरदार पावसासोबतच प्रति तास ४० – ५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे, शुक्रवारी सकाळी ८ ते सायंकाळी ६ या कालावधीत शहर भागात / १, पूर्व उपनगरात – ४ ठिकाणी तर पश्चिम उपनगरात – ४ अशा एकूण ९ ठिकाणी झाडे/ फांद्या पडल्याच्या घटना घडल्या असून त्यात कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. तसेच, शहर भागात – ४ ठिकाणी, पश्चिम उपनगरात – ५ ठिकाणी अशा एकूण ९ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here