Twitter: @maharashtracity

मुंबई: मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाविरोधात नुकतेच मुंबई गोवा जन आक्रोश समितीकडून सायकल रॅली आयोजित केली होती. आता ३१ मे पर्यंत एक मार्गिकेचे काम पूर्ण न केल्यास शिवराज्याभिषेक दिनी कोकणातील सर्व संघटना एकत्रित निर्णय घेऊन संपूर्ण कोकणात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

मुंबई – गोवा महामार्गाचे काम १२ वर्षे रखडलेले असून मंत्र्यांनी केवळ आश्वासने देत न्यायालयाच्या आदेशाला हरताळ फासला आहे. या दिरंगाई आणि ढिसाळपणामुळे तीन हजारपेक्षा अधिक कोकणवासियांचा अपघाती मृत्यु झाला आहे. त्यामुळे कोकणवासीय प्रचंड नाराज आहेत. यावेळी समितीचे पनवेल विभागाचे प्रमुख डॉ. अमित चव्हाण यांनी रखडलेला मुंबई – गोवा महामार्ग हा कोकणावरील अन्याय असल्याचे नमूद करून अन्यायाला वाचा फोडण्यासाठी समितीचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.

कुठल्याही अपघातग्रस्तासाठी पहिला एक तास अत्यंत महत्वाचा असून वैद्यकीय भाषेत त्याला ‘गोल्डन अवर’ असे म्हणतात. या वेळेत जर पेशंट वर योग्य उपचार झाले तर मेंदूतील रक्तस्त्राव वगैरे कारणामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण कमी होते. दुर्दैवाने अगदी पोलादपूर ते महाडपासून पनवेलपर्यंत कुठेही अद्ययावत ट्रॉमा सेंटर नाही. त्यातच रस्त्याची अवस्था बिकट, त्यामुळे पेशंट वेळेवर डॉक्टरपर्यंत पोहचत नाही व मृत्यूचे प्रमाण वाढते. १२ वर्षात या महामार्गावर सुमारे ३३०० लोक मृत्युमुखी पडले आणि १० हजारपेक्षा जास्त लोकांना कायमचे अपंगत्व आले.

महामार्गावर अद्यावत ट्रामा सेंटर असावे ही जन आक्रोश समितीची प्रमुख मागणी आहे. तसेच रस्त्यावरील खड्ड्यामूळे तरुण लोकांना स्लिप डिस्क सारखे मणक्यांचे आजार बळावत आहेत. त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करावा यासाठी सरकारला जागे करणे गरजेचे आहे. तर समितीचे सचिव रुपेश दर्गे यांनी सागितले की, जन आक्रोश आंदोलन ही सर्वसामान्य कोकणवासियांची एक समिती म्हणून महामार्गासाठी काम करीत आहे. कोणत्याही राजकीय पक्षाचा पाठिंबा न घेता किंवा कोणत्याही राजकीय अजेंडा न घेता महामार्गासाठी लढत आहेत. जर शासन, प्रशासन व ठेकेदार यांनी दिलेल्या मुदतीपर्यंत म्हणजे ३१ मे २०२३ पर्यंत एक मार्गी काम पूर्ण न केल्यास शिवराज्याभिषेक दिनी शिवरायांचे आशीर्वाद घेऊन आम्ही समस्त कोकणकर आणि समस्त कोकणातील सर्व संघटना एकत्रित निर्णय घेऊन एकाच दिवशी एकाच वेळेस संपूर्ण कोकणात तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here