केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उपस्थिती
By Anant Nalawade
Twitter: @nalavadeanant
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या ऐतिहासिक संवादाचा शतकोत्सव मुंबईसह उपनगरातील ३६ विधानसभा क्षेत्रात तब्बल ५ हजाराहून अधिक ठिकाणी प्रचंड उत्साहात साजरा करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विलेपार्ल्यातील म. ल. डहाणूकर महाविद्यालयातल्या केशवराव घैसास सभागृहात हजर राहून कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण ऐकले.
कार्यक्रमाला खा. पूनम महाजन, मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार, आ. पराग आळवणी, माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, अभिनेते सचिन खेडेकर यांच्यासह विलेपार्ले परिसरातील सर्व क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी समाजघटकांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. महिला व बालविकास, पर्यटन मंत्री ॲड. मंगलप्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत भायखळा येथील मुंबई महिला कारागृहात कार्यक्रम पार पडला. विधान परिषदेतील भाजपा गटनेते आ. प्रवीण दरेकर यांच्या पुढाकाराने मागाठाणेत दहा विविध समाजघटकांसाठी कार्यक्रम घेण्यात आला. यात विविध समाजघटकांनी पंतप्रधानांशी संवाद साधला. त्यात घरेलू कामगार, रिक्षाचालक, आदिवासी, मुस्लिम बांधव, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग नागरिक, अंगणवाडी सेविका, विद्यार्थी प्रतिनिधी, पापड उद्योगातील महिला आणि सफाई कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
प्रत्येक समाजघटकातील ५०० प्रतिनिधी असे पाच हजार प्रतिनिधीनी पंतप्रधान मोदींशी संवाद साधला. यावेळी उपस्थित कामगारांचा सन्मान करण्यात आला. खा. गोपाळ शेट्टी पोईसर येथील कार्यक्रमात सहभागी झाले. खा. मनोज कोटक यांच्या उपस्थितीत पोवई तलाव परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. आ. अतुल भातखळकर यांच्या उपस्थितीत हनुमान नगर येथे कार्यक्रम संपन्न झाला. दहिसर विधानसभेत आ. मनीषाताई चौधरी यांच्या नेतृत्वाखाली ५ हजार नागरिकांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला.
आ. कॅप्टन तमिल सेल्वन यांनी सायन कोळीवाडा येथे कार्यक्रम घेतला. आ. मिहीर कोटेचा यांनी मुलुंड येथे कार्यक्रमाचे आयोजन केले. आ. भारती लव्हेकर यांनी वर्सोवा येथे कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण ऐकले. आ. विद्या ठाकूर यांनी गोरेगाव लिंक रोड येथे कार्यकर्त्यांसोबत उपस्थित राहून कार्यक्रमाचे रेडिओ प्रसारण ऐकले. आ. योगेश सागर यांनी चारकोप येथील कार्यक्रमात सहभाग घेतला. आ. सुनील राणे यांनी बोरीवलीतील कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. आ. प्रसाद लाड यांच्या मार्गदर्शनात सायन सर्कल येथे कार्यक्रम झाला. यावेळी गरजू महिलांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. आ. पराग शाह यांच्या उपस्थितीत घाटकोपर येथे कार्यक्रम घेण्यात आला.
भाजप मुंबई युवा मोर्चातर्फे नवीन युवा मतदारांना खास आमंत्रित करण्यात आले. यानिमित्ताने ओबीसी मोर्चाच्या वतीने ५० चहाच्या स्टॉलवर मोफत चहा वितरण करण्यात आले. अल्पसंख्याक आघाडीच्यावतीने शीर खुर्मा बेत करत प्रमुख दर्गा, मदरसा आणि उर्दू शाळांमध्ये कार्यक्रम संपन्न झाला. भाजपा लीगल सेलतर्फे वकिल बांधवांच्या उपस्थितीत ईशान्य मुंबईत कार्यक्रम पार पडला. पश्चिम महाराष्ट्र आघाडीकडून खास मुंबईतील डबेवाल्यांसाठी कार्यक्रम घेण्यात आला.
दक्षिण भारतीय सेलने वरळीतील महिलांसाठी विशेष कार्यक्रम घेतला. उत्तराखंड सेलकडून २०० नागरिक पारंपारिक वेशभूषा करून कार्यक्रमात सहभागी झाले. संयुक्त महाराष्ट्र दालनात कामगार आघाडीचा विशेष कार्यक्रम घेण्यात आला. भाजपा सांस्कृतिक सेलतर्फे आधार कार्ड, मतदार कार्डसाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले.