पुलाला तडा गेल्याचा संदेश मिळताच वाहतूक बंद
मात्र पाहणीअंती पुलाला तडे गेले नसल्याचे सिद्ध, वाहतूक पूर्ववत
@maharashtra.city
मुंबई: दक्षिण मुंबईतील डॉ. गोपाळराव देशमुख मार्ग (पेडर रोड – केम्पस कॉर्नर फ्लाय ओव्हर) उड्डाणपुलावर तडा गेल्याचा संदेश वाहतूक पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर हा पूल वाहतूक पोलिसांनी १४ सप्टेंबर रोजी दुपारी तातडीने वाहनांसाठी बंद केला होता. त्यामुळे या पुलाचा वापर करणाऱ्या वाहन चालकांमध्ये गैरसमज निर्माण झाला होता.
यानंतर, महापालिकेचे अतिरिक्त पालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांच्या निर्देशानुसार उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले, वाहतूक पोलीस विभागाचे अतिरिक्त आयुक्त महेश पाटील, पालिकेच्या पूल विभागाचे अभियंते, पूल संरचना लेखापरीक्षक यांनी या ठिकाणी भेट देऊन परीक्षण केले.
या परीक्षण अंती आढळले की, या पुलावर कोणताही तडा गेलेला नसून पूल वाहतुकीसाठी सुरक्षित आहे. त्यानंतर म्हणजे अर्ध्या तासाच्या आत पूल वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्यात आला.