वेळीच संकेत मिळाले व इमारत तात्काळ खाली केल्याने जीवित हानी टळली
@maharashtracity
मुंबई: मुंबईत बुधवारी रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. अशातच काळबादेवी, बदामवाडी येथे म्हाडाच्या ‘झालान भवन ‘ ८० वर्षे जुन्या इमारतीच्या दुरुस्तीचे सुरू असताना इमारतीचा पुढील भाग गुरुवारी दुपारी १.३० वाजता अगोदर पडला तर अर्ध्या तासाने पश्चिमेकडील मोठा भाग अचानकपणे कोसळण्याची दुर्घटना घडली.
सुदैवाने पहिला भाग कोसळला त्याचवेळी इमारतीमधील अंदाजे ६० – ७० लोकांना बाहेर काढून इमारत खाली करण्यात आली. तर दुसऱ्यांदा इमारतीचा भाग कोसळला त्यावेळी इमारतीच्या परिसरात उभे अनेकजण थोडक्यात बचावले. कोणीही जखमी झालेले नाही. अन्यथा मोठी जीवित हानी झाली असती.
कुर्ला येथे नाईकनगर सोसायटीत सोमवारी रात्री इमारत कोसळून १९ जणांचा बळी गेला तर १४ जण जखमी झाले. या दुर्घटनेला काही तास उलटले होते. काळबादेवी, बदामवाडी येथे म्हाडाच्या ‘झालान भवन’ ही ८० वर्षे जुनी तळमजला अधिक चार मजली इमारत आहे. या इमारतीत १२ फ्लॅट व्यावसायिक कामांसाठी वापरले जात होते तर ४ फ्लॅट रहिवाशी वापरत होते.
या इमारतीत काही सुवर्ण कारागीर लोक मोठ्या प्रमाणात काम करीत होते. ही इमारत काहीशी धोकादायक स्थितीत आल्याने म्हाडाकडून गेल्या दीड वर्षांपासून इमारत दुरुस्तीचे काम सुरू होते. मात्र म्हाडाने नेमलेल्या कंत्राटदाराकडून इमारत दुरुस्तीचे काम हे अतिशय मंदगतीने सुरू होते. त्यातच मालक व भाडेकरू यांच्यातील वादामुळेही काम राखल्याचे समजते.
या इमारतीच्या दुरुस्तीच्या कामासाठी इमारतीचा पुढील भाग खाली करण्यात आला होता. तर मागील भागात काही व्यवसायिक गाळे होते व काही लोक राहत होते. गुरुवारी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास इमारतीचा पुढील काही भाग अचानकपणे कोसळला. त्यामुळे इमारतीत व परिसरात घबराट पसरली.
तातडीने इमारत खाली करण्याच्या हालचाली करण्यात आल्या. सर्वजण इमारत खाली करून बाहेर आले. त्यातच अवघ्या अर्ध्या तासात म्हणजे दुपारी २ वाजेच्या सुमारास इमारतीचा पश्चिमेकडील मोठा भाग पत्त्यासारखा अचानकपणे कोसळला. त्यावेळी इमारतीच्या खालील भागात व परिसरात अनेकजण उभे होते. त्यांना दुर्घटना घडण्यापूर्वीच त्याची चाहूल लागली. त्यांनी वेळीच तेथून पळ काढल्याने ते सर्वजण थोडक्यात बचावले. अन्यथा मोठी जीवित हानी झाली असती.
या इमारत दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ ५ फायर इंजिन, १ रेस्क्यू व्हॅन, ४ रुग्णवाहिका यांसह घटनास्थळी धाव घेतली व मदतकार्य सुरू केले. पालिका प्रभाग कार्यालयाकडून घटनास्थळी १३ कामगार व १ जेसीबी यांची मदत पाठविण्यात आली. यासंदर्भातील माहिती माजी नगरसेवक जनक संघवी व आकाश पुरोहित यांनी दिली.
ही इमारत म्हाडाची असून जुनी इमारत आहे. काळबादेवी सारख्या गजबजलेल्या मार्केटच्या परिसरात अनेक दुमजली, चार मजली इमारती धोकादायक परिस्थितीत आहेत. तरीही अनेकजण अशा इमारतीत जीव मुठीत धरून राहतात व काही इमारतीमध्ये व्यवसायही करतात. अनेक इमारती या धोकादायक स्थितीत आहेत.
दरम्यान, माजी नगरसेवक आकाश पुरोहित यांनी, तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच, अग्निशमन दलाला युद्धपातळीवर बचावकार्य करण्याची विनंती केली.
धोकादायक इमारतीकडे लक्ष द्यायला अभियंते नाहीत -: जनक संघवी यांची खंत
काळबादेवी परिसरात अनेक जुन्या इमारती आहेत. काही इमारती मोडकळीस आल्या आहेत. मात्र त्याकडे लक्ष द्यायला अभियंते चंदनवाडी कार्यालयात जागेवर नसतात. त्यांचे मोबाईल फोन बंद स्थितीत असतात, अशी खंत माजी नगरसेवक जनक संघवी यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केली. याकडे नवीन सरकारने लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.