मुंबई तुंबल्यास आदित्य ठाकरे जबाबदार – भाजप

२५ वर्षांच्या सत्तेनंतरही मुंबईकर असुरक्षित # आदित्य ठाकरेंनी मुंबईकरांची माफी मागावी

@maharashtracity

मुंबई: मुंबईत ७८ टक्के नव्हे फक्त ३५ टक्के नालेसफाई झाली आहे. पालिकेचा आकडा हा रतन खत्रीचा आकडा आहे. त्यामुळे पावसाळ्यात जर मुंबई तुंबली तर त्यास शिवसेना, मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) व काँग्रेसचे नेते नाना पटोले (Nana Patole) हे कारणीभूत असतील, असा इशारा भारतीय जनता पक्षाने (BJP) दिला आहे.

२५ वर्षे पालिकेत सत्ता उपभोगल्यानंतरही जर पावसाळयात मुंबईकरांच्या सुरक्षिततेची हमी देऊ शकत नसाल तर पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईकरांची माफी मागावी, अशी मागणी भाजपचे आमदार व नेते आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) यांनी केली आहे.

मुंबईत सध्या नालेसफाईची (Nullah Safai) कामे जोरात सुरू आहेत. पालिकेतील भाजपचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे, विनोद मिश्रा, भालचंद्र शिरसाट आदींसमवेत भाजप नेते आशिष शेलार यांनी गुरुवारी नालेसफाईच्या कामांची पाहणी केली. यावेळी, मालाड येथील वलनाई, जूहु येथील एसएनडीटी तर कुर्ला येथील मिलिंद नगर नाल्यावर जाऊन कामाची पाहणी करण्यात आली. हे नाले कचरा व गाळाने भरलेले आढळून आले असे सांगत, आशिष शेलार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर तोफ डागत वरीलप्रमाणे मागणी केली.

नालेसफाईच्या कामांबाबत आज आम्ही पालिका आयुक्तांना भेटणार हे माहिती झाल्याने मंत्री आदित्य ठाकरे यांनी आमच्या अगोदरच पावसाळी कामांबाबत आढावा बैठक घेत धावाधाव सुरू केली. वास्तविक, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनीही एक महिन्यापूर्वी बैठक घेतली होती. मात्र आता पालकमंत्री उशिराने जागे झाले, असा आरोप आमदार शेलार यांनी यावेळी केला.

मुंबईत पावसाळा तोंडावर आलेला असताना नालेसफाईची कामे पूर्ण झालेली नाहीत. मुंबईत इमारत दुर्घटना घडली, बत्ती गुल झाली, अतिवृष्टी झाली तर पालिकेचा आपत्कालीन प्लॅन तयार असल्याचे दिसत नाही. यंत्रणेत समन्वय नाही. मुंबई आमची म्हणता तर मुंबईकरांची जबाबदारी स्वीकारून त्यांच्या सुरक्षिततेसाठी फाईव्ह स्टार हॉटेल्स, पार्ट्या सोडून पालकमंत्री यांनी रस्त्यावर उतरून दाखवावे, असे आव्हान आमदार शेलार यांनी शिवसेनेला दिले आहे.

जर पालिकेत भाजप सत्तेवर आली तर गेल्या २५ वर्षात सत्ताधारी शिवसेनेला जी कामे करता आली नाही ती कामे निम्म्या कालावधीत पूर्ण करण्यात येतील, असा दावाही आमदार शेलार यांनी यावेळी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here