Twitter : @maharashtracity
पन्नास वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या ७१ टक्के प्रौढांना प्रौढांसाठीच्या लसीकरणाबाबत माहिती असून देखील फक्त १६ टक्के प्रौढांनी प्रौढांसाठी असलेली एखादी लस घेतली आहे. रुग्ण व डॉक्टर्स ह्यांनी सांगितलेली कारणे यात तफावत आढळली असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. असोसिएशन ऑफ फिजिशिअन्स इंडिया (एपीआय) आणि इप्सोस ह्यांच्यातर्फे १६ शहरांमध्ये हे सर्वेक्षण घेण्यात आले. ५० वर्षांहून अधिक वयाचे प्रौढ, त्यांची काळजी घेणारे व डॉक्टर्स यांचा सहभाग या सर्वेक्षणात होता.
औपचारिक मार्गदर्शक तत्त्वे नसल्यामुळे रुग्णांना लसीकरणाबाबत फारसा रस वाटत नाही व त्यांच्यात लस घेण्याचे प्रमाण कमी असते, असे बहुसंख्य (९० टक्के) डॉक्टरांनी सांगितले. तर डॉक्टरांकडे वेळेची मर्यादा असल्यामुळे ते रुग्णांसोबत प्रौढांसाठीच्या लसीकरणाबाबत फारशी चर्चा करत नाहीत, तसेच खर्च आणि प्रतिबंधाहून अधिक प्राधान्य उपचारांना द्यावे लागत असल्यामुळे रुग्णही लसीकरणाच्या शिफारशी ऐकून घेण्यास फारसे उत्सुक नसतात असे डॉक्टरांना वाटते. डॉक्टरांकडून ठामपणे शिफारस न केली गेल्यामुळे प्रौढांसाठीच्या लशी घेण्याच्या दृष्टीने सक्रियपणे काही केले जात नाही, असे रुग्णांचे म्हणणे आहे.
५० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे अनेक रुग्ण (६९ टक्के) आणि त्यांची काळजी घेणारे (७६ टक्के) डॉक्टरांना प्रौढांसाठीच्या लसीकरणाबद्दल विचारत नाहीत, कारण, आवश्यकता असेल तर डॉक्टर स्वतःहूनच शिफारस करतील असे त्यांना वाटते. प्रौढांमधील लसीकरणाचे प्रमाण कसे सुधारावे ह्याबाबत विचारले असता, कोविड-१९ लसीकरणाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी वापरलेले उपाय प्रौढांच्या लसीकरणासाठीही वापरावेत असे प्रौढ रुग्ण (५५ टक्के) आणि त्यांची काळजी घेणाऱ्यांनी (४८ टक्के) सांगितले.