@maharashtra.city

मुंबई: काही दिवसांपूर्वी केईएममधील परिचारिका राहत असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली हेती. त्यासाठी ती इमारत धोकादायक सांगत रिक्त करण्याची नोटीस बजावण्यात आली. ही इमारत खाली करून परिचारिकांचे इतर ठिकाणी पुनर्वसन केले जाणार असल्याच्या निषेधार्थ सुमारे ३०० परिचारिकांनी केईएम रुग्णालयात (KEM Hospital) शुक्रवारी आंदोलन केले. यावर अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांच्यासह परिचारिकांची बैठक झाली असून यावर तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

दरम्यान, परळ येथील केईएम रुग्णालय हे पालिकेचे प्रमुख रुग्णालय असून या रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालय तसेच नर्स प्रशिक्षण केंद्रही (Nursing training centre) चालवले जाते. यात शेकडो विद्यार्थीनी नर्सचे शिक्षण घेत आहेत. याच ठिकाणी नर्स सेवा निवासस्थान आहेत. सन १९२६ मध्ये ही इमारत बांधण्यात आली होती. रुग्णालयात दुरुस्तीचे काम सुरू असले तरी या इमारतीची दुरुस्ती करण्यात आलेली नाही.

दिनांक ३ नोव्हेंबरला सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास जेवण बनवण्यासाठी संगीता चव्हाण (वय ४० वर्षे) या आल्या असता सिलिंगचा काही भाग त्यांच्यावर कोसळला. यात चव्हाण यांच्या डोक्याला मार लागला. ही इमारत अतिधोकादायक (dilapidated building) झाली आहे. यामुळे, पालिकेने इमारत त्वरित रिक्त करण्याची नोटीस बजावली आहे. इमारत खाली केल्याने ३०० परिचारिकांची शिवडी टीबी रुग्णालयात असलेल्या कर्मचारी निवासस्थानात राहण्याची व्यवस्था केली जाणार होती. मात्र, या निर्णयाला परिचारिकांनी विरोध करत निदर्शने केली.

परिचारिकांना जवळच्या डॉक्टरांसाठी असलेल्या निवासस्थानात जागा द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. आपल्या मागणीसाठी आणि सेवा निवासस्थान खाली करावे लागत असल्याने ३०० परिचारिकांनी रुग्णालयात आंदोलन केले. दरम्यान, पर्यायी व्यवस्थेचा शोध सुरु केला असून लवकरच हा प्रश्न मार्गी लावला जाणार असल्याच्या आश्वासना नंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here