अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी नालेसफाई कामांची घेतली झाडाझडती
@maharashtracity
मुंबई: मुंबईत महापालिकेकडून नालेसफाईची (Nullah Safai) कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. मात्र एमएमआरडीए (MMRDA), पीडब्ल्यूडी (PWD) प्राधिकरणाच्या हद्दीत ज्या ठिकाणी नालेसफाईच्या कामांना अद्यापही सुरुवात करण्यात आलेली नाही अथवा ज्या ठिकाणी नालेसफाईची कामे अपूर्ण आहेत ती कामे तातडीने मार्गी लावण्याचे आदेश पालिका अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी सबंधितांना दिले आहेत.
त्यांनी बुधवारी पूर्व उपनगरातील सहा विभागात नालेसफाईच्या कामांची पाहणी करून झाडाझडती घेतली. त्यावेळी पालिकेच्या नालेसफाईच्या कामांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. मात्र, पालिका वगळता इतर प्राधिकरणांच्या हद्दीतील नालेसफाईच्या कामांबाबत त्यांनी आवर्जून चौकशी केली. त्यावेळी एमएमआरडीए आणि पीडब्ल्यूडी हद्दीतील नालेसफाईची कामे तातडीने मार्गी लावण्याचे आदेश संबंधित पालिका उपायुक्त यांना दिले.
तसेच, या प्राधिकरणाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी आवश्यक पत्रव्यवहार व कार्यवाही प्राधान्याने करावीत, असे निर्देशही त्यांनी परिमंडळीय उप आयुक्तांना दिले आहेत. यावेळी, पूर्व उपनगरातील चेंबूर, गोवंडी, मानखुर्द, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, कांजूरमार्ग, मुलुंड भागातील काही मोठ्या नाल्यांच्या ठिकाणी भेट देऊन नालेसफाईच्या कामांची पाहणी केली.
या पाहणी दौऱ्याप्रसंगी पालिकेच्या परिमंडळ – ५ चे उप आयुक्त व परिमंडळ – ६ चे प्रभारी उप आयुक्त विश्वास शंकरवार, एम/पूर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त महेंद्र उबाळे, ‘एम/पश्चिम’ विभागाचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे, ‘एल’ विभागाचे सहाय्यक आयुक्त महादेव शिंदे, ‘एन’ विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय सोनावणे, ‘एस’ विभागाचे सहाय्यक आयुक्त अजितकुमार आंबी, ‘टी’ विभागाचे सहाय्यक आयुक्त चक्रपाणी अल्ले, पर्जन्य जलवाहिन्या खात्याचे अभियंता, संबंधीत अभियंता वर्ग आणि महानगरपालिकेचे संबंधीत अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
काढलेला गाळ निर्धारित वेळेत हटवा
पूर्व उपनगरातील नालेसफाईची कामे प्रगतीपथावर असून योग्यप्रकारे होत असल्याचे पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. मात्र, नालेसफाईच्या कामाअंतर्गत नाल्यातून काढण्यात आलेल्या गाळ हा निर्धारित वेळेतच हलविण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
पूर्व उपनगरातील नाल्यांबाबत माहिती
पूर्व उपनगरांतील ‘परिमंडळ – ५’ मध्ये ६९ मोठे नाले असून, ‘परिमंडळ – ६’ मध्ये ४५ मोठे नाले आहेत. तर ‘परिमंडळ – ५’ मध्ये ३६० छोटे नाले असून ‘परिमंडळ – ६’ मध्ये ३३० छोटे नाले आहेत. या व्यतिरिक्त दोन्ही परिमंडळांमध्ये रस्त्यालगतच्या पर्जन्य जलवाहिन्या व कल्व्हर्ट (मोरी) देखील आहेत. या सर्व ठिकाणी सुरु असलेल्या पावसाळीपूर्व कामांचा अतिरिक्त आयुक्त यांनी, प्रत्यक्ष व सांख्यिकीय आढावा या नालेसफाई कामांच्या पाहणी दौऱ्यादरम्यान घेतला.
तसेच त्यांनी कांजूरमार्ग येथील मालमोटारीचे व त्यातील सामानाचे वजन मोजणा-या वजनकाट्याची (Weighing Bridge) व तेथील कार्यपद्धतीची पाहणी देखील केली.