संपाच्या तिसरा दिवस
रुग्णांचे हाल, संप मागे घेण्याचे सर्वसामान्यांचे आवाहन
Twitter : @maharashtracity
मुंबई: जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी राज्यातील चतुर्थ, तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. गुरुवारी संपाचा तिसरा दिवस होता. या संपामुळे रुग्णसेवेवर परिणाम झाला. तिसऱ्या दिवशी मुंबईतील राज्य सरकारच्या रुग्णालयातील ओपीडीत शुकशुकाट दिसला. तर चतुर्थ श्रेणी कर्मचारी नसल्याने रुग्णालयीन परिसरात अस्वच्छता दिसून आली.
दरम्यान, जेजे रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कामगार संपावर असल्याने ठिकठिकाणी बॉटल्स, अन्न पदार्थांचा कचरा, पुठ्ठे, कागद हे सर्व जेजेच्या वॉर्डमध्ये आणि वॉर्ड बाहेर परिसरात पाहायला मिळाले. यासह कचऱ्यांनी भरलेले कचऱ्याचे डब्बेही शौचालयात आणि इतर ठिकाणी असल्याचे तसेच चित्र होते. तर जे जे रुग्णालयाच्या अस्थिव्यंगोपचार शास्त्र विभाग कक्ष क्र. १३, पुरूष कक्ष या विभागात वैद्यकीय कचरा आणि इतर खाद्यपदार्थांनी भरलेले कचऱ्याचे डब्बे तसेच भरलेले होते. यासह शौचालयांमध्ये ही अस्वच्छता पसरली आहे. कान-नाक- घसा या कक्षात ही अशीच परिस्थिती होती. डॉक्टर्स उपचार करुन निघून जात असले तरी अस्वच्छतेमुळे रुग्ण हैराण झाले आहेत. त्यामुळे, किमान रुग्णांसाठी तरी हा संप मागे घ्यावा असे आवाहन नातेवाईक करत आहेत. तर जेजे रुग्णालयातील आपत्कालीन विभागातही शुकशुकाट होता. मोजून फक्त चार ते पाच रुग्ण दाखल होते. शिकाऊ विद्यार्थी आणि डॉक्टर्स इथे उपचार देत असले तरी परिचारिका नसल्याने लक्ष देणारे कोणी नाही, हे माहिती असल्याने रुग्णांना दाखल करुन घेतले जात नाही. सर्व बेड्स रिक्त आहेत.
एमआरआय बंद
सामान्यपणे जेजे रुग्णालयात दिवसाला २० ते २५ एमआरआय होतात. पण, संपात प्रशिक्षित तांत्रिक ही सहभागी झाल्याने एमआरआय बंद ठेवले गेले आहे. दिवसभरात एखाद-दुसरे डाॅक्टरांच्या सहाय्याने एमआरआय केले जाते, पण ओपीडी आणि वाॅर्ड मधूनच एमआरआयसाठी पाठवले जात नसल्याने एमआरआय सध्या बंद आहे. आपातकालीन मात्र सिटीस्कॅन केले जात आहे.
शवविच्छेदन बंद :
चतुर्थ श्रेणी कर्मचारीच नसल्याने रुग्णालयातील शवविच्छेदन ही बंद ठेवण्यात आले आहे. कॅझ्युल्टी विभागामधूनच मृतदेह शवविच्छेदन विभागात पाठवले जात नाहीत. तसेच ज्या मृतदेहांना शवविच्छेदनाची गरज पडते त्यांना केईएम रुग्णालयात पाठवले जाते. तसेच, डॉक्टर्स ही शवविच्छेदन लिहून देणे टाळत असल्याचे संपकरी चतुर्थ श्रेणी कामगार वर्गातील कर्मचाऱ्यांनी सांगितले.
गेट सभा आणि घोषणाबाजी :
दरम्यान, लेखी आश्वासन मिळेपर्यंत आणि मागण्या मान्य होईपर्यंत हा संप मागे घेणार नसल्याचे सांगत गुरुवारी सकाळी कर्मचाऱ्यांनी गेट सभा घेतली. तसेच परिचारिका आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी मिळून जेजे परिसरात रॅली काढली. शासनाविरोधात घोषणाबाजी करत आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत ही परिस्थिती अशीच राहिल असे ही परिचारिका आणि कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
.