नेत्र विभागाच्या विरोधातील तक्रार प्रकरण पेटणार
Twitter : @maharashtracity
मुंबई: मुंबईतील जे जे रुग्णालयातील नेत्रविभागातील नऊ डॉक्टरांनी तडकाफडकी राजीनामा दिले. यात पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने (Dr Tatyasaheb Lahane) आणि नेत्र तज्ज्ञ डॉ.रागिणी पारेख (Dr Ragini Parekh) देखील आहेत. जे जे रुग्णालयतील नेत्र विभाग गेली कित्येक वर्षे राज्य मोतीबिंदू मुक्त होण्यासाठी काम करत असूनही या विभागाविरोधात होत असलेल्या तक्रारी म्हणजे जे जे रुग्णालय आणि प्रशासनाची नालस्ती असून ती सहन होत नसल्याने आम्ही राजीनामे देत असल्याचे या नऊ डॉक्टरांनी म्हटले आहे.
दरम्यान, डॉ. रागिणी पारेख, डॉ. तात्याराव लहाने, डॉ. प्रितम सामंत, डॉ. स्वरंजीतसिंग भट्टी, डॉ. अश्विन बाफना, डॉ. हेमा मालिनी मेहता, डॉ. शशी कपूर, डॉ. दिपक भट, आणि डॉ. सायली लहाने या नऊ डॉक्टरांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. या नऊ डॉक्टरांनी म्हटल्याप्रमाणे गेली २८ वर्षे नेत्र विभागातील डॉक्टर्स रात्रंदिवस रुग्णसेवा करीत आहेत. त्यामुळे या विभागाचे नाव जगभरात प्रसिद्धीस आले. सहा महिन्यापूर्वी या विभागात पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकण्यासाठी रुजू झालेल्या निवासी डॉक्टरांच्या तक्रारीवरुन नऊ डॉक्टरांचे म्हणणे न ऐकताच चौकशी सुरु ठेवण्यात आली. दरम्यान, अधिष्ठात्यांकडून मागील वर्षभरात नेत्र विभागाला कोणतीही मदत केलेली नाही. उलटपक्षी प्राध्यापकांना वारंवार त्रास देण्यात आला. त्याचसोबत बदनामी देखील करत आहेत. त्यामुळे प्राध्यापक मानसिक दबावाखाली आहेत. यातून पुढे ३१ मे रोजी राजीनामा देत असल्याचे त्यांनी घोषित केले आहे. मात्र, त्यानी या विभागातील रुग्णसेवा सुरुळीत सुरु ठेवण्यासाठी काही मागण्या केल्या आहेत. यात अधिष्ठात्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच ज्या निवासी डॉक्टरांना भडकविण्याचे काम केले, त्या तीन निवासी डॉक्टरांचे पीजी रजिस्ट्रेशन रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच इतर निवासी डॉक्टरांना बेशिस्त वर्तन केल्याबद्दल कडक समज द्यावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
काय आहे हे प्रकरण :
दोन दिवसांपूर्वी जे जे रुग्णालयाच्या नेत्र विभागातील निवासी डॉक्टरांनी शस्त्रक्रियेच्या संधीचा अभाव, अभ्यासकांचा अभाव, संशोधन कार्याचा अभाव आणि विभागातील निवासी डॉक्टरांना नियमितपणे तोंड द्यावे लागणारे असंसदीय वर्तन यासारख्या अनेक तक्रारी केल्या. तसेच एनएमसीच्या निर्देशानुसार विभाग चालवावा, अशी मागणी देखील करण्यात आली. तसेच नेत्रचिकित्सा विभागात निवासी डॉक्टरांवर अन्याय अडचणी वाढत असून या ठिकाणी अशैक्षणिक वातावरण असल्याचे सांगण्यात आले. यात जे जे नेत्ररोग विभागातील निवासी डॉक्टर डॉ. टी. पी. लहाने आणि डॉ. रागिणी पारेख यांच्या हुकूमशाहीबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. यावर त्वरीत चौकशी करुन बाधित रहिवाशाच्या त्रासाला मदत केली असली तरी, या संवेदनशीलतेची जलद ट्रॅकिंग सुनिश्चित करण्यासाठी प्रकरण उघड करणे आवश्यक असल्याची मागणी करण्यात आली आहे. या तक्रार सत्रावरुन हा मुद्दा वाढला असून आता यात राजीनामा सत्र सुरु झाले आहे.
निवासी डॉक्टरांचे आंदोलन
दरम्यान, बुधवारी संध्याकाळी तक्रारदार निवासी डॉक्टरांनी जेजे रुग्णालय आवारात आंदोलन करत या सर्व प्रकरणाविषयी निषेध व्यक्त केला.
यावेळी जेजे रुग्णालयाचे निवासी डाॅ. शुभम सोनी यांनी सांगितले की, आमच्या चार प्रमुख मागण्या आहेत. नवीन व्यक्तीने पदभार स्वीकारला तर किमान निवासी डॉक्टरांना योग्य प्रशिक्षण मिळेल. म्हणून आम्ही बदल्यांची ही मागणी केली आहे. जोपर्यंत या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलनावर ठाम आहोत.
राजीनाम्यावर प्रतिक्रिया
माझ्याकडे एकही राजीनामा आलेला नसून डाॅ. रागिणी पारेख यांनी ३१ मे रोजी १५ दिवसांच्या फक्त वैद्यकीय रजेचा अर्ज दिला असल्याची माहिती जेजे समूह रुग्णालयाच्या अधिष्ठाता डाॅ. पल्लवी सापळे यांनी दिली आहे.