भाजपकडून आरोप व कारवाईची मागणी

@maharashtracity

मुंबई: देवनार कत्तलखाना आधुनिकीकरणाचे ४०० कोटी रुपयांचे कंत्राट मिळविण्यासाठी सल्लागाराने संगनमत करून निविदासंबंधित कागदपत्रांचा पुरवठा केला, असा गंभीर आरोप भाजपचे माजी गटनेते व ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर शिंदे (Prabhakar Shinde) यांनी केला आहे. याप्रकरणी संबंधित कंत्राटदार व सल्लागाराने नोटीस मिळूनही खुलासा दिलेला नाही. त्यामुळे सल्लागारावर कडक कारवाई करावी, अशी मागणी भाजपतर्फे करण्यात आली आहे.

देवनार कत्तलखाना आधुनिकीकरण (Deonar slaughter house modernization project) या नावाखाली मुंबई महापालिकेने (BMC) काही महिन्यांपूर्वी ४०० कोटी रुपयांची निविदा मागवली होती. त्यावेळी, भाजपने या निविदा प्रक्रियेतील अनेक त्रुटींवर बोट ठेवून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. भाजपच्या (BJP) विरोधामुळेच पालिकेने ती निविदा रद्द केली होती, असा दावा प्रभाकर शिंदे यांनी यावेळी केला.

या कंत्राटातील सल्लागाराने (consultant) निविदा निघण्यापूर्वीच संबंधित कंत्राटाची काही कागदपत्रे या निविदेत भाग घेणाऱ्या कंत्राटदारांना पुरविली होती. दोन वर्षापूर्वीच सल्लागार व कंत्राटदार (contractor) यांचे यात संगनमत होते व त्यामधूनच निविदा भरण्यासंदर्भात ही कागदपत्रे दिली गेली होती, असा आरोप प्रभाकर शिंदे यांनी केला आहे.

देवनार आधुनिकीकरण निविदेतील सल्लागाराला अशाच प्रकारे संगनमत करून निविदा भरण्याच्या प्रकाराबाबत सीसीआय (Competition Commission of India) या यंत्रणेने १.५२ कोटी रुपये कर आकारणी केलेली होती. मुंबई मनपामध्ये एसबीडी (Standard Bid Document) नुसार दंडात्मक कारवाई झालेल्या कंत्राटदार / सल्लागारास लेखी खुलास देणे आवश्यक असते. परंतु, या प्रकरणातील सल्लागार अथवा कंत्राटदार यांनी, अशा प्रकाराचा कोणताही खुलासा आजपर्यंत महापालिकेला सादर केलेला नाही.

मुंबई महापालिकेच्या पारदर्शकतेच्या अनुषंगाने ही बाब अतिशय गंभीर असून प्रशासनाने सल्लागाराला कारणे दाखवा नोटीस देण्याव्यतिरिक्त कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा भाजप या प्रकरणी संबंधित सल्लागारावर कठोर कारवाईची मागणी करीत आहे, असे प्रभाकर शिंदे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here