@maharashtracity
हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांचा अंदाज
मुंबई: आजपासून सुरु झालेल्या नव्या वर्षात मुंबई शहरासह उपनगरी भागात किमान तापमान १३ ते १४ डिग्री खाली घसरेल. तर कमाल तापमान २६ ते २७ डिग्री पर्यंत घट होऊन चांगलीच थंडी जाणवू शकते. नव्या वर्षात म्हणजेच ६ जानेवारी २०२२ पर्यंत राज्यात गोठणारी थंडी अनुभवयास येणार आहे.
महाराष्ट्राशेजारील गुजरात (Gujarat), पश्चिम मध्य प्रदेश (Madhya Pradesh) या राज्यात देखील आगामी आठवड्यात किमान तापमानात विशेष घट होऊन तेथेही चांगलीच थंडी जाणवणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तविला आहे. तर शुक्रवारी उपनगरातील किमान तापमान २१.६ तर शहरात किमान तापमान २२ डिग्री सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले.
दरम्यान, राज्यात आता पाऊस, गारपीट होणार नसून थंडीसाठी पोषक वातावरण असल्याचा अंदाज खुळे यांनी व्यक्त केला आहे. तसेच संपूर्ण राज्यात फक्त थंडीच राहणार आहे. यामुळे थंडीचा रब्बी पिके (Rabbi crops) तसेच उन्हाळ (गावठी) पेर व लागवड केलेल्या कांद्याना फायदा होत आहे. तसेच चालु असलेल्या उन्हाळी कांदा लागवडीला नजिकच्या काळात वातावरणाचा कोणताही अडथळा जाणवणार नसल्याचे सांगण्यात आले.
दरम्यानच्या काळात म्हणजेच पुढील आठवड्यात काश्मीर (Kashmir), लेह (Leh) लडाखपासुन (Ladakh) राजस्थान (Rajasthan) उत्तर मध्य प्रदेशसह उत्तर प्रदेशपर्यंत (Uttar Pradesh) एका मागोमाग
एक अशा पश्चिमी प्रकोपांच्या साखळीतून नेहमी प्रमाणे अक्षवृत्त समांतर पश्चिमेकडून पूर्वेकडे मार्गस्थच होणार आहे.
परिणामी संपूर्ण उत्तर भारत पाऊस (Rain), बर्फवृष्टी (Snowfall) तर काही ठिकाणी गारपीट (Hailstorm) व दाट धुके व त्यातून सकाळच्या वेळेत खालावलेली दृश्यमानता (Visibility) अशा वातावरणीय घडामोडीची उलथा-पालथ तेथे होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या वातावरणीय घडामोडीमुळे महाराष्ट्रात (Maharashtra) चांगली थंडी पडू शकते, अशी माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.