@maharashtracity

१.७९ कोटी दुसरा डोस देण्यात देशात राज्य अव्वल

मुंबई: तिसऱ्या लाटेची दाहकता कमी करण्यासाठी राज्य सरकारने लसीकरण मोहिमेला गती दिली असून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत बुधवारी रात्री आठ वाजेपर्यंत १४ लाख ३९ हजार ८०९ नागरिकांना लस देण्यात आली असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाकडून देण्यात आली. दरम्यान, राज्याने सर्वाधिक म्हणजे १ कोटी ७९ लाख जणांना लसीची दुसरी मात्रा देऊन देशात विक्रम केला असल्याचेही सांगण्यात आले.

राज्यातील लसीकरण मोहिमेत आतापर्यंत दिलेल्या एकूण डोसेसची संख्या ६ कोटी ५५ लाख झाली आहे. लसीकरणात मोठ्या टप्प्यात २१ ऑगस्ट रोजी ११,०४,४६५ डोस, तर ३० ऑगस्ट रोजी १०,३५,४१३ डोस, १ सप्टेंबर रोजी ९,७९,५४० डोस तर ४ सप्टेंबर रोजी १२,२७,२२४ डोस देण्यात आले.

यात १८ पेक्षा अधिक वयाच्या लोकसंख्येपैकी कमीत कमी एक डोस लाभार्थ्यांचे प्रमाण ४८.४६% टक्के आहे. तर १८ ते ४४ वयोगटातील लोकसंख्येपैकी कमीत कमी एक डोस लाभार्थ्यांचे प्रमाण ३७.८८% टक्के आहे. तसेच ४५ पेक्षा अधिक वयाच्या कमीत कमी एक डोस दिला गेलेल्या लोकांचे प्रमाण ५२.२४% एवढे असल्याचे सांगण्यात आले.

तसेच राज्यात आजपर्यंत एकूण ६ कोटी ५५ लाख २० हजार ५६० लसींच्या मात्रा देण्यात आल्या असून त्यात सर्वाधिक १ कोटी ७९ लाख ७८ हजार ८०५ जणांना दुसऱ्या लसीची मात्रा देऊन त्यांना पूर्णपणे सुरक्षित करण्यात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे.

यावर बोलताना सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले की, लसीकरण कार्यक्रमातील हे आजपर्यंतचे सर्वाधिक लसीकरण झाले असून आरोग्य यंत्रणेतील सर्व घटक यासाठी परिश्रम घेत आहेत. दरम्यान, लसीकरण मोहिमेला राज्यात गती देण्यासाठी आरोग्य यंत्रणा घेत असलेल्या परिश्रमांबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी आरोग्य विभागाच्या डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.

नुकत्याच झालेल्या ‘माझा डॉक्टर’ ऑनलाईन वैद्यकीय परिषदेमध्ये तज्ज्ञांनी देखील लसीकरणावर विशेष भर देण्याची गरज अधोरेखित केली असून त्यापूर्वीपासूनच राज्य सरकारने लसीकरणाला (vaccination) गती दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here