Twitter : @Rav2Sachin

मुंबई :

मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाकडे पुरेसे वाहन चालक, जवान आणि सुपरवायझर उपलब्ध नसतानाही मुंबई महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्चून तातडीने 22 शीघ्र प्रतिसाद वाहने (Quick Response Vehicle) खरेदी केली आहेत. या वाहनांचे परिचलन आणि वापरात येण्यासाठी कंत्राटदार नेमण्यात आला आहे. त्यामुळे ही खरेदी नेमकी कोणाच्या फायद्यासाठी केली गेली? कोणता कंत्राटदार यासाठी उत्सुक होता, अशी शंका उपस्थित केली जात आहे.

मुंबईत कुठेही आगीची घटना घडली, झाड पडले, इमारत कोसळली तर मुंबई अग्निशमन दलाचे जवान (Fire Brigade Jawan) घटनास्थळी पोहोचून प्रसंगी जिवाची बाजी लावून मुंबईकरांचे प्राण वाचवतात. यात काही प्रसंगी अग्निशमन अधिकारी शहिद झाले आहेत. अत्यंत प्रशिक्षित असलेले हे अधिकारी आणि जवान त्यांच्या कर्तव्याच्या प्रती अत्यंत समर्पित असतात. अशा महत्वाच्या विभागात कंत्राटी जवान नेमने कितपत योग्य राहील? ते कामाच्या प्रती किती समर्पित राहतील? मुंबईकरांनी या कंत्राटी अग्निशमन जवानांवर किती विश्वास ठेवावा? मुंबईकरांच्या जीवाचे मोल आहे की नाही? असे सवाल महापालिका वर्तुळात चर्चिले जात आहेत.

महापालिकेने आता शीघ्र प्रतिसाद वाहनांवर काम करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने जवान, चालक आणि सुपरवायझर यांची नियुक्ती (appointment of jawan, driver and supervisor on contract basis) केली आहे. परंतु शीघ्र प्रतिसाद वाहनांवर जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या कंत्राटी जवान आणि सुपरवायझर यांचा दुर्दैवाने घटनास्थळी मृत्यू झाला तर अग्निशमन दलाचे जवान आणि अधिकारी यांच्याप्रमाणे त्यांना शहीद घोषित केले जाणार आहे का ? मुंबईकरांचे प्राण वाचविण्यासाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावणाऱ्या कंत्राटी जवानांनाही राष्ट्रपती वा आयुक्तांच्या पदकाने गौरविले जाणार का ? तसेच त्यांनी प्राणाची आहुती दिली तर त्याच्या परिवाराला सर्व लाभ देऊन त्याच्या कुटुंबातील एकाला नोकरीचा लाभ तरी देणार का ? की केवळ कंत्राटी जवानांचा वापर करून घटनास्थळी त्यांचा मृत्यू वा ते जखमी झाल्यावर त्यांना व त्यांच्या परिवाराला वाऱ्यावर सोडले जाणार आहे ? या बद्दल कोणताही उल्लेख अग्निशमन दलाने स्वतः च्या प्रसिध्दी पत्रकात केलेला नाही.

अलीकडेच मुंबई अग्निशमन दलाने प्रसिध्दी माध्यमांसाठी प्रसिद्धी पत्रक प्रसिध्द केलेले आहे. हे प्रसिध्दी पत्रक शीघ्र प्रतिसाद वाहनांना बद्दल होते. प्रसिध्दी पत्रकात केवळ शीघ्र प्रतिसाद वाहनांबद्दलच (QRV Vehicle) माहिती दिलेली होती. मात्र त्या वाहनांवर काम करणाऱ्या कंत्राटी जवानांना, वाहन चालकांना आणि सुपरवायझर यांना किती वेतन असणार, कंत्राटी जवान आणि सुपरवायझर यांनी मुंबईकरांचे प्राण वाचविण्यासाठी जीवाची आहुती दिली तर त्यांना व त्यांच्या परिवाराला कोणते लाभ मिळणार, याचा उल्लेख पत्रकात करण्यात आलेला नाही.

महानगरातील दाटीवाटीची लोकवस्ती, अरुंद रस्ते व गल्ली, जास्त वाहतूक कोंडीचे मार्ग इत्यादी ठिकाणी आपत्कालीन परिस्थिती उद्भवते, त्याप्रसंगी जलद प्रतिसादासाठी मुंबई अग्निशमन दलाकडे शीघ्र प्रतिसाद वाहनांचा पर्याय उपलब्ध झाला आहे. एखादी आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर तेथे त्वरित मदत पोहोचविता यावी या हेतूने मुंबई अग्निशमन दलात २२ शीघ्र प्रतिसाद वाहनांचा ताफा दाखल झाला आहे. या वाहनांमुळे आपत्कालीन प्रसंगांत संभाव्य हानी रोखून दुर्घटनांवर कमीत कमी वेळेत नियंत्रण ठेवण्यास मुंबई अग्निशमन दलास मदत होणार आहे, असा उल्लेख अग्निशमन दलाने प्रसिद्धी पत्रकात केलेला आहे.

मात्र चालक, सुपरवायझर आणि दोन फायरमन असे चौघे जण या क्यूआरव्ही वाहनासोबत असणारे सर्वजण हे कंत्राटी पद्धतीने काम करणारे असणार आहेत. क्यूआरव्ही वाहनांमध्ये ५०० लिटर पाणी, रेस्क्यू टूल्स उपलब्ध आहेत. चालक, सुपरवायझर आणि दोन फायरमन असे चौघे जण या वाहनासोबत घटनास्थळी पोहोचणार आहेत. हे चारही जवान महाराष्ट्र अग्निशमन सेवा येथून किंवा शासनमान्य संस्थांकडून प्रशिक्षण घेतलेले असतील, असे अग्निशमन दलाने म्हटले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलात २२ शीघ्र प्रतिसाद वाहनांसाठी सुमारे १८० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आलेला आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च करतांना अग्निशमन दलात क्युआरव्ही वाहने चालविण्यासाठी वाहन चालक आणि काम करण्यासाठी जवान आणि अधिकारीच नसल्याने कंत्राटी पद्धतीचा वापर करण्यात आला आहे.

कोट्यावधी रुपयांचे शीघ्र प्रतिसाद वाहने चालविण्यासाठी वाहन चालक आणि त्यावर काम करण्यासाठी जवान, सुपरवायझर उपलब्ध नसतानाही वाहने झटपट खरेदी केली गेली. वाहने खरेदी केल्यावर आता कंत्राटी पद्धतीने चालक, जवान आणि सुपरवायझर यांची क्युआरव्ही वाहनांवर नियुक्ती करून वाहने सुरू करण्यात आलेली आहे.

क्यूआरव्ही वाहनानांसाठी चालक, जवान आणि सुपरवायझर उपलब्ध नसल्याचे माहीत असतानाही इतक्या तडकाफडकी क्यूआरव्ही वाहने खरेदी करण्यामागे कोणाचा हात होता?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here