@maharashtracity

मुंबई: मुंबईत चार महिने बरसणाऱ्या पावसाचा परतीचा प्रवास सुरु असताना गुरुवारी दुपारी शहर व उपनगरात ढगांच्या गडगडाटासह पावसाने काही वेळ जोरदार बरसात केली. आकाशात काळ्या ढगांनी एकच गर्दी केल्याने मुंबईकर काहीसे धास्तावले होते. सुदैवाने संध्याकाळी पावसाचा जोर कमी झाला आणि मुंबईकरांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

सकाळी ८ ते संध्याकाळी ६ या कालावधीत शहर भागात १५.६६ मिमी, पश्चिम उपनगरात – ९.७४ मिमी आणि पूर्व उपनगरात – ५.७१ मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली. तसेच, आगामी २४ तासात शहर व उपनगरात आकाश अंशतः ढगाळ राहून गडगडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

मुंबईत दरवर्षी सरासरी २,२०० ते २,७०० मिमी इतका पाऊस पडतो. विशेषतः उपनगरात पावसाचे प्रमाण अधिक असते. यंदा जून महिन्यात पाऊस कमी प्रमाणात पडला. मात्र, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस पडला. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतही समाधानकारक पाऊस पडला. मुंबई बाहेरील पाच प्रमुख तलावांमधून पाणीपुरवठा होतो. त्या तलावांतही यंदा चांगला पाऊस पडल्याने जवळजवळ ५ तलाव भरले. तर उर्वरित दोन तलाव ९८ टक्केपेक्षाही जास्त भरलेले आहेत.

मात्र, आता ऑक्टोबर महिना उजाडून दोन आठवडे संपत आले आहेत. तरीही पावसाने परतीचा प्रवास पूर्णपणे सुरु केल्याचे दिसत नाही. अद्यापही अधूनमधून परतीचा पाऊस कमी – अधिक प्रमाणात कोसळत आहे. गुरुवारी दुपारी दोन वाजण्यापूर्वीच काळ्या ढगांनी आकाशात एकच गर्दी करून जणू काही ‘आपत्कालीन बैठक’ बोलावली होती. याच काळ्या ढगांनी काही अवधीतच अगदी मुंबईकर सावध होत असतानाच पावसाची जोरदर बरसात केली. त्यामुळे मुंबईकर काहीसे धास्तावले होते. कामावर गेलेले चाकरमानी, शाळेत, कॉलेजमध्ये गेलेले मात्र छत्री सोबत न घेतलेले विद्यार्थी हेसुद्धा पावसाची बरसात बघून काहीसे घाबरले होते. मात्र, सुदैवाने संध्याकाळी पावसाने विश्रांती घेतली.

दरम्यान, दिवसभरात शहर भागात एका ठिकाणी झाड/ फांदी पडण्याची घटना घडली. तर, पूर्व आणि पश्चिम उपनगरात प्रत्येकी एका ठिकाणी म्हणजे एकूण दोन ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या आहेत. तसेच, शहर व पश्चिम उपनगर भागात प्रत्येकी एका ठिकाणी म्हणजेच एकूण दोन ठिकाणी घर/ घराचा भाग पडण्याच्या घटना घडल्या आहेत. सुदैवाने या घटनांत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here