@maharashtracity
मुंबई: मुंबईतील१८ ते ६९ वयोगटातील नागरिक मधुमेहाने ग्रस्त असल्याचे पालिकेने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. सन २०२१ मध्ये मुंबईत केलेल्या डब्लूएचओ स्टेप्स सर्वेक्षणानुसार, १८ टक्के व्यक्तींमध्ये उपाशी पोटी रक्ताच्या केलेल्या चाचणीतून त्यांच्या रक्तातील ग्लुकोजची पातळी १२६ एमजी ग्रॅम पेक्षा जास्त असल्याचे आढळले.
तसेच, मुंबई सार्वजनिक आरोग्य विभागाच्या (Public Health Department) एमआयएस सेलच्या नोंदणी प्रणाली २०२१ नुसार, एकूण मृत्यूंपैकी १४ टक्के मृत्यूचे कारण मधुमेह (Diebetic) असल्याचे समोर आले आहे. १४ नाव्हेंबर या जागतिक मधूमेह दिनानिमित्त हे निष्कर्ष मोठ्या प्रमाणावर जागरूकता आणि लोकसंख्येच्या तपासणीची गरज अधोरेखित करतात.
यासाठी मुंबई महानगरपालिका (BMC) उच्च रक्तदाबासाठी घरोघरी जाऊन लोकसंख्या आधारित स्क्रीनिंग सर्वेक्षण सुरू करणार आहे. तसेच, डिसेंबर २०२२ पासून झोपडपट्टी परिसरात आशा आणि आरोग्य सेविकांच्या माध्यमातून सर्व २४ वॉर्डांमध्ये एनसीडीचे जोखीम घटकांना शोधून काढणार आहे.
यावर बोलताना पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी सांगितले की, मुंबईतील नागरिकांनी २०० हून अधिक महानगरपालिका दवाखाने आणि एचबीटी क्लिनिक/पॉलीक्लिनिकमध्ये मधुमेह आणि हायपरटेंशनची तपासणी, निदान आणि उपचारांसाठी असणाऱ्या सुविधांचा लाभ घ्यावा.
तर कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ मंगला गोमारे यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाने नागरिकांच्या जीवनशैलीत बदल करण्याच्या गरजेवर भर दिला आणि पालिकेने २४ वॉर्डांमध्ये १४९ योग केंद्रे देखील सुरू केली असल्याचे सांगितले. दरम्यान, संयुक्त कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांच्या मते मधुमेह असलेल्या ५० टक्के लोकांना त्यांच्या मधुमेहाच्या स्थितीबद्दल माहिती नसते आणि ज्यांना मधुमेह आहे ते नियमित उपचार घेत नाहीत आणि त्यामुळे गुंतागुंत टाळण्यासाठी जागरूक राहणे आणि रक्तातील साखरेची नियमित तपासणी करणे महत्त्वाचे आहे.
पालिकेने सुरु केलेल्या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी पालिकेने सर्व नागरिक, प्रसारमाध्यमे, स्वयंसेवी संस्था, खाजगी संस्था, कॉर्पोरेट्सला त्यांच्या डॉक्टरांकडून रक्तातील साखर आणि रक्तदाब तपासण्यासाठी पाठिंबा देण्याचे आणि लोकांना प्रेरित करण्याचे आवाहन केले आहे. या आजारांपासून बचाव करण्यासाठी त्यांच्या दैनंदिन जीवनात निरोगी खाण्याच्या सवयी, निरोगी आहार आणि पुरेशा शारीरिक हालचालींद्वारे निरोगी जीवनशैलीचा प्रचार करण्याचे आवाहन केले जाणार आहे.
वारंवार लघवी होणे, थकवा, जास्त तहान लागणे, अंधुक दिसणे, हात-पाय सुन्न होणे किंवा पायावर सूज/ व्रण येणे यासारख्या लक्षणांबाबत नागरिकांनी सतर्क राहावे, ही लक्षणे दिसल्यास व्यक्तींनी महापालिकेच्या दवाखाने व रुग्णालयांमध्ये सल्ला व तपासणी करून घ्यावी. पालिका सर्व आरोग्य सुविधांमध्ये रुग्णांना मधुमेहाची तपासणी आणि निदानाची सुविधा देत असून दर महिन्याला ५० हजारांहून अधिक रुग्ण मधुमेहावर उपचार घेत आहेत. ३० वर्षांवरील व्यक्तींच्या स्क्रीनिंगचे प्रमाण वाढण्यासाठी पालिकेने ऑगस्ट २०२२ पासून १५ पालिका रुग्णालयांमध्ये रक्तदाब आणि मधुमेहाच्या स्क्रीनिंगसाठी एनसीडी कॉर्नर्स सुरू केले आणि आत्तापर्यंत ३२ हजार ०९६ स्क्रीनिंग केले गेले आहे.