१५ मेपर्यंत नालेसफाईची कामे पूर्ण करणार

यंदा हिंदमाता पुरमुक्त होणार

अतिवृष्टी व मोठी समुद्र भरती तर मुंबईत पाणी साचणार

नालेसफाई, पंपिंग कामांवर यंदा २५० कोटींचा खर्च

@maharashtracity

मुंबई: मुंबईतील लहान – मोठ्या नाल्यांची साफसफाई ३१ मे ऐवजी १५ मे पर्यंत जादा यंत्रणा वापरून पूर्ण करण्यात येईल. मुंबईची भौगोलिक स्थिती पाहता अतिवृष्टी झाल्यास व त्याच वेळी समुद्रात मोठी भरती असल्यास मुंबईतील सखल भागात पाणी साचते. पालिकेने यंदा पुरस्थितीपासून दिलासा देण्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवली आहे. मात्र २ -३ वर्षात ८०० कोटी रुपये खर्चून माहुल व मोगरा पंपिंगचे काम पूर्ण झाल्यावर मुंबई खऱ्या अर्थाने पूरमुक्त (flood free Mumbai) होईल, अशी माहिती पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी व्यक्त केला आहे.

मुंबईत सध्या नदी व नाले यांच्या सफाईचे काम सुरू आहे. गेल्या आठवड्याभरात भाजपने (BJP) नालेसफाईच्या कामांची झाडाझडती घेण्यासाठी पाहणी दौरा केला. मात्र अनेक नाल्यांची सफाई झालेली नसल्याने संताप व्यक्त केला. तसेच, वेळेत नालेसफाई (Nullah Safai)न झाल्यास मुंबईची तुंबई होण्याची शक्यता व्यक्त करीत आयुक्तांकडे तक्रार केली होती.

त्यानंतर पालिका आयुक्त इकबाल (BMC Commissioner IS Chahal) यांनी, गुरुवारी अतिरिक्त आयुक्त पी.वेलरासू यांच्यासह पश्चिम उपनगरातील वांद्रे येथील ‘बीकेसी कनेक्टर ब्रिज’ येथील मिठी नदीतील (Mithi river) सफाई काम, उत्तर भारतीय संघ भवनाजवळील वाकोला नदीतील सफाईकाम, वांद्रे रेल्वे स्थानकनजीकचा नाला, धीरूभाई अंबानी शाळेजवळील मिठी नदीच्या पश्चिम बाजूला सुरू असलेल्या नालेसफाई कामांची पाहणी केली.

यावेळी, उपायुक्त उल्हास महाले, विभास आचरेकर, जनसंपर्क अधिकारी तानाजी कांबळे, उप जनसंपर्क अधिकारी गणेश पुराणिक आदी अधिकारी उपस्थित होते.

पूरस्थिती रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना

मुंबई महापालिका यंदाच्या पावसाळ्यात नालेसफाई कामाला १५ – २० दिवस उशीर झालेला आहे. मात्र गतवर्षी १७ मे रोजी मुंबईत आलेल्या “तौक्ते” वादळामुळे (Taukte cyclone) नालेसफाईची कामे रखडली होती. आता त्याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी यंदा यंत्रणा दुप्पट करून १५ मे पूर्वीच नदी व नाले सफाईची कामे पूर्ण करण्यात येतील.

पावसाळ्यात सखल भागात पाणी साचल्यास सहा मोठ्या पंपिंग स्टेशन, ४०० ठिकाणी लहान पंप बसवून पाण्याचा निचरा जलदपणे समुद्रात करण्यात येणार आहे. हिंदमाता येथे साचणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी कै. प्रमोद महाजन गार्डन येथे व झेवीयर्स गार्डन या दोन ठिकाणी पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साठवून ठेवणाऱ्या भूमीगत टाक्यांचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या टाक्यातील पाण्याचा निचरा नंतर पंपाच्या साहाय्याने समुद्रात करण्यात येईल.

पावसाळयात साचणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी टाटा मिलच्या जागेत जमिनीखालून पाईपलाईन टाकण्यात येत आहे. तसेच, परळ येथे दोन रॅम्प उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे यंदा हिंदमाता येथे पावसाचे पाणी साचणार नाही. पूर्व द्रुतगती मार्गावरील वाहतूक पावसाळ्यात कुठेही थांबणार नाही. पावसाळ्यात पाण्याचा निचरा करण्यासाठी यंत्रणा कमी पडू देणार नाही, असा दावाही आयुक्तांनी यावेळी केला.

नालेसफाई कामांवर लक्ष ठेवण्यासाठी भरारी पथके

नालेसफाईच्या कामांवर लक्ष ठेवण्यासाठी पालिकेने अधिकाऱ्यांची ‘भरारी पथके’ नेमल्याचे पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी सांगितले. या भरारी पथकाने आठवड्यातून दोन वेळा आपला फीडबॅक देणे अपेक्षित आहे.

कंत्राटदारांनी नदी व नाल्यातून गाळ काढल्यावर तो गाळ सुकल्यानंतर त्याच ठिकाणी त्या गाळाचे वजन करण्यात येईल. तसेच, तो गाळ नियोजित ठिकाणी टाकताना त्या ठिकाणीही त्या गाळाचे वजन करण्यात येते. या सर्व कामांचे चित्रीकरण करण्यात येते. तसेच, जीपीएस यंत्रणा वापरण्यात येणार आहे. कोणी आक्षेप घेतल्यास त्यांना ते दाखविण्यात येईल. त्यामुळे नालेसफाईच्या कामात पारदर्शकता राखण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नालेसफाई व पंपिंग व्यवस्थेवर २५० कोटींचा खर्च – पी. वेलरासू, अतिरिक्त आयुक्त

मुंबईतील ३४० किमीच्या नाल्यांची साफसफाई करण्यासाठी व त्यातील गाळ काढून त्याची वाहतूक करून गाळाची विल्हेवाट लावण्यासाठी पालिका यंदा १६० कोटी कोटी रुपये खर्च करीत आहे. तर पावसाळयात सखल भागात साचणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी यंदा पालिका ३५० ऐवजी ४०० ठिकाणी कमी -अधिक क्षमतेचे पंप बसविणार आहे. या पंपिंगच्या व्यवस्थेवर किमान ८० – ९० कोटी रुपये असे एकूण २५० कोटींचा खर्च करणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू ( प्रकल्प) यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली.

तसेच, नालेसफाई कामातील गाळ उचलण्याची व तो मुंबईबाहेर करण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदारांची असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here