@maharashtraciy
मुंबई महापालिका घेणार खासगी रुग्णालयांची मदत
मुंबई: खासगी रुग्णालयांच्या सहभागातून कोरोनावर यशस्वी नियंत्रण मिळविल्यानंतर मुंबई महापालिकेने आता २०२५ पर्यंत मुंबईला क्षयरोगमुक्त करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. (TB free Mumbai by 2025) त्यासाठी खासगी रुग्णालये, वैद्यकीय संस्था यांची मदत घेण्यात येणार आहे.
यासंदर्भातील माहिती पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.
मुंबईत गेल्या मार्च २०२० पासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढीस लागला. कोरोनावरील औषध अद्यापही न सापडल्याने त्याला मुळासकट हद्दपार करणे, मुंबई महापालिकेला एकट्याला कठीण जात होते.
त्यामुळेच पालिकेने खासगी रुग्णालये, खासगी वैद्यकीय संस्था यांची मदत घेतली व कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेवर यशस्वीपणे नियंत्रण मिळविले. एवढेच नव्हे तर आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यातही पालिकेला काहीसे यश आले आहे. (BMC succeeded to control first and second wave of corona)
ही बाब लक्षात घेता, सन २०२५ पर्यंत मुंबईतून क्षयरोग निर्मूलन करण्याकरीता खासगी क्षेत्रातील रुग्णालयांसमवेत भागीदारी करण्याचा निर्णय महापालिका आरोग्य प्रशासनाने घेतला आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांनी दिली आहे.
कोरोनाच्या कालावधीत मुंबईतील नागरिकांना पालिकेने खासगी क्षेत्रातील व्यावसायिकांच्या मदतीने विविध आरोग्य सुविधा पुरविल्या. कोरोनाग्रस्त रूग्णांना उपचार, विलगीकरण व लसीकरण मोहीम या सर्वांमध्ये खासगी क्षेत्राबरोबर महापालिका प्रशासनाने भागीदारी यशस्वी करुन दाखविली.
हा अनुभव पाहता, महापालिकेने २०२५ पर्यंत क्षयरोग निर्मुलनाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी खासगी रुग्णालयांना सोबत घेण्याचा निर्णय घेतला आहे.
यासंदर्भात, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्या अध्यक्षतेखाली खासगी क्षेत्रातील भागीदारांसोबत नुकतीच एक बैठक पार पडली. कोरोना नियंत्रण व्यवस्थापनामध्ये जी ४३ खासगी रूग्णालये महापालिका प्रशासनासमवेत कार्यरत होती, त्यांना क्षयरोग निर्मूलन – २०२५ करीता सहभागी होण्याकरीता निमंत्रित करण्यात आले आहे.
५० टक्के क्षयरोग रुग्ण खासगी क्षेत्रात
मुंबईतील ५० टक्के क्षयरोग रुग्ण संख्या खासगी क्षेत्रातून येत असल्याकारणाने खासगी क्षेत्राने क्षयरोग निर्मूलन करण्यामध्ये आपापल्या क्षमतेप्रमाणे पुढाकार घेणे महत्त्वाचे आहे.
कोरोना काळातील भागीदारीचा अनुभव पाहता महापालिका व खासगी क्षेत्राने क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमात योगदान देण्याचे आवाहन सुरेश काकाणी यांनी याप्रसंगी केले.
यावेळी, मुंबई महापालिका सार्वजनिक आरोग्य खात्याच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमामधील खासगी रूग्णालये यांना सहभागी होण्याकरीता उपलब्ध असलेल्या उपक्रमाची माहिती दिली.
तसेच, हिंदुजा रूग्णालय, युनिसन मेडीकेअर, डॉक्टर्स फॉर यू, के. जे. सोमय्या रूग्णालय, सर्वोदय रूग्णालय या रुग्णालयांमध्ये औषध प्रतिरोधी क्षयरोग उपचार केंद्र उपक्रम राबविण्यात येत आहेत. या खासगी रुग्णालयांचेही डॉ. गोमारे यांनी अभिनंदन केले.
मुंबई शहर क्षयरोग अधिकारी डॉ.प्रणीता टिपरे यांनी राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम अंतर्गत क्षयरोग दूरीकरण ध्येय गाठण्याकरीता खासगी रूग्णालयांच्या सहभागाने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांबाबत तसेच खासगी रूग्णालयांकडून अपेक्षित योगदानाबाबत व त्यांना महापालिकेकडून देण्यात येणाऱया सुविधांबद्दल माहिती दिली.
क्षयरोग्यांसाठी दोन नवीन औषधे
राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम अंतर्गत उपलब्ध उपक्रमांमध्ये सहभाग घेतल्याने रूग्णांकरीता दोन नवीन औषधे उपलब्ध होतील, अशी माहिती मुंबई शहर क्षयरोग अधिकारी डॉ. प्रणीता टिपरे यांनी दिली.
या उपक्रमांमध्ये सहभागी होण्याकरीता रूग्णालयांनी करार केल्यास विकेंद्रीकरण करण्याबाबत मदत होईल व क्षयरूग्णांना घराजवळ उपचार सुविधा उपलब्ध होतील, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.