@maharashtracity
हवेचा दर्जा खालावला
मुंबई: पाकिस्तानात (Pakistan) निर्माण झालेले धुळीचे वादळातील (dust storm) वारे गुजरात (Gujarat), अरबी समुद्रामार्गे (Arabian Sea) येऊन उत्तर कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यावर पसरले होते. यामुळे मुंबई शहरावर धुलीकण पसरल्याने शहरातील दृष्यमानता (Visibility) आणि हवेचा दर्जा (air quality) खालावला होता.
माझगाव, मालाड सारख्या भागात प्रदूषणाने (air pollution) खालची पातळी गाठल्याचे समोर आले. दरम्यान, दुपारनंतर धुळ निवळू लागल्याचे हवामान तज्ज्ञांकडून सांगण्यात आले.
यावर बोलताना भारतीय हवामानशास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले की, मुंबईसह महाराष्ट्राच्या क्षितिजावर रविवारी दिसून आलेल्या वातावरणीय घटनेला धुळीचे वारे म्हणावे. हे धुळीचे वादळ नसल्याचे स्पष्ट केले. अशा वातावरणीय घटना किरकोळ वेळी यापूर्वी घडल्या आहेत.
धुळीचे वादळ कराची (Karachi) पाकिस्तान भागात निर्माण झाले होते. रविवारी उत्तर कोकणात (Konkan) धुळीच्या वाऱ्याचा प्रभाव दिसून आला. यामुळे मुंबईत सकाळपासून हवेची गुणवत्ता खालावल्याची माहिती हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.
दरम्यान रविवारी मुंबई शहराचा सरासरी हवेचा दर्जा निर्देशांक (Air Quality Index – AQI)) ३३३ इतका नोंदविण्यात आला. काही स्थानिक ठिकाणच्या नोंदीप्रमाणे कुलाबा २२१, भांडूप ३३६, बीकेसी ३॰७, चेंबुर ३४७, अंधेरी ३४॰, बोरिवली १६२, माझगाव ३७२, वरळी ३१९, मालाड ४३६, नवी मुंबई १॰१ असे एआयक्यू नोंदविण्यात आले. यात मालाड आणि माझगाव येथील हवेचा दर्जा प्रचंड प्रमाणात खालावला होता असल्याचे दिसून आले.
३० ते ४० किमी वेगाने वारे
कराचीमध्ये निर्माण झालेल्या धुळीच्या वादळाची सिस्टम उत्तर-पश्चिमेला खाली आली. त्या परिणामातून सौराष्ट्र आणि कच्छमध्ये हे वादळ दिसून येईल असा अंदाज शनिवारीच हवामान विभागाकडून करण्यात आला होता. हे वारे ३० ते ४० किमी वेगाने वाहत होते.
यामुळे मुंबईत सकाळी आठ ते दहा वाजेच्या सुमारास मुंबईतील हवेचा दर्जा सर्वाधिक खालावला होता. सकाळी ११ वाजल्यानंतर हे वातावरण निवळू लागले. या पूर्वी यमन-गल्फमध्ये निर्माण झालेली धुळीची वादळे समुद्र पार करुन भारतीय प्रदेशात गुजरात आणि कच्छमार्गे मुंबईवर घोंगावल्याचा तुरळक नोंदी असल्याचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर म्हणाले.