Twitter @maharashtracity

मुंबई: मुंबईतील १५ वॉर्डात आतापर्यंत गोवर रुग्ण आढळून येत होते. यात सोमवारी अजून तीन वॉर्डांची भर पडली. बी, डी आणि टी हे ते तीन वॉर्ड असून यातून प्रत्येकी एक गोवर रुग्ण आढळला, अशी माहिती पालिका आरोग्य विभागाकडून देण्यात आली. तसेच सोमवारी दिवसभरात एकूण ११ गोवर रुग्णांची (measles patients) नोंद करण्यात आली. तर एक संशयित गोवर मृत्यू असल्याचे सांगण्यात आले.

११ गोवर रुग्णांची नोंद सोमवारी करण्यात आली. तर ए वॉर्डात १, डी १, ई २, एफ उत्तर १, जी उत्तर १, जी दक्षिण १, एच पूर्व ३, के पूर्व २, के पश्चिम २, पी उत्तर २, आर दक्षिण १, एल ६, एम पूर्व ७, एम पश्चिम ३, एस १ असे संशयित रुग्ण आहेत. आरोग्य विभागाच्या गोवर मृत्यू तपासणीच्या सोमवारच्या सांगितलेल्या अहवालानुसार अंधेरी येथील एक वर्षाच्या मुलीचा मृत्यू गोवर संशयित असल्याचे सांगण्यात आले. या मुलीचे लसीकरण (vaccination) झाले नव्हते. तसेच ती जन्मजात हृदयाच्या व्हेंट्रीक्युलर सेप्टल डिफेक्ट विथ पेटेंट डक्टस आर्टरीज या आजाराची रुग्ण होती. दोन आठवड्यांपूर्वी तिला हृदयविकाराच्या उपचारासाठी महिनाभर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. २६ नोव्हेंबर रोजी तिला ताप आणि पुरळ येऊन श्वसनाला त्रास होण्यास सुरवात झाली. त्यामुळे पालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. २८ नाव्हेंबर रोजी तिच्यावर अत्यावश्यक उपचार करुनही प्रकृती खालावत गेली. अखेर रविवारी तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूचे कारण ब्राँकायन्युमोनियासह ॲक्युट रेस्पिरेटरी फेल्युर असे सांगण्यात आले.

दरम्यान, आतापर्यंत २ लाख ५९ हजार ७० घरांच्या तपासणीत ११५ ताप आणि पुरळ असलेले रुग्ण आढळून आले. तर ६० नियमित लसीकरण सत्रातून १५० जणांना एमआर१ तसेच १६७ जणांना एमएमआर लस देण्यात आली. शिवाय १३७ अतिरिक्त सत्रातून ३७४ जणांना एमआर१ तर ४९६ जणांना एमएमआर लस देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here