Twitter: @maharashtracity
मुंबई: बाळासाहेब ठाकरे यांच्या १७ नोव्हेंबरच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यांचे लोकार्पण करण्यात आले. मुंबईकरांच्या सेवेत असलेल्या या दवाखान्यांतून आतापर्यंत २ लाख ६ हजार ४४८ इतक्या मुंबईकरांनी लाभ घेतला असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आली.
आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनानुसार सध्या ६६ ठिकाणी आपले दवाखाने कार्यरत आहेत. येत्या २६ जानेवारीपर्यंत दवाखान्यांची संख्या १०० इतकी करण्याचे लक्ष्य असल्याचे कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली आहे.
आपला दवाखान्यात मोफत वैद्यकीय तपासणी, औषधोपचार, किरकोळ जखमांवर मलमपट्टी यासह १४७ प्रकारच्या रक्त चाचण्यांची सेवा मोफत देण्यात आली आहे. शिवाय एक्स-रे, सोनोग्राफी आदी चाचण्यांकरिता पॅनलवरील डायग्नॉस्टिक केंद्रांद्वारे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दरात संबंधित वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. त्याचबरोबर विशेष तज्ज्ञांच्या सेवा देखील पॉली क्लिनिक व डायग्नॉस्टिक सेंटरद्वारे उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
आपले दवाखाने हे प्रामुख्याने सकाळी ७ ते दुपारी २ आणि दुपारी ३ ते रात्री १० या कालावधीदरम्यान कार्यरत आहेत. यातून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे व टॅब आधारित पद्धतीने सॉफ्टवेअरच्या माध्यमातून रुग्णांची माहिती, आजाराचा तपशील, औषधांचा साठा व वितरण तसेच संदर्भित केलेल्या निदान सुविधा यांचा तपशिल नोंदविण्यात येत आहे. यामुळे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखान्यांचे कामकाज हे विनाकागद अर्थात पेपरलेस पद्धतीने व पर्यायाने पर्यावरण पूरक होत असल्याचे सांगण्यात आले.