@maharashtracity

शेवटच्या दिवशी उशिरापर्यंत ४५१ हरकती- सूचना

अंधेरी (पूर्व) विभागात सर्वात जास्त ८५ हरकती

कुलाबा विभागात शून्य हरकती व सूचना

२०१७ च्या निवडणुकीत प्राप्त झाल्या होत्या ६१३ हरकती व सूचना

मुंबई: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीबाबतची (BMC polls) तारीख जाहीर झालेली नाही. मात्र निवडणूक प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे. सरकार व पालिका यांनी यंदाच्या निवडणुकीसाठी ९ प्रभाग वाढवत पुनर्रचना केली आहे. त्यावर १ ते १४ फेब्रुवारी या कालावधीत हरकती व सूचना मागवल्या होत्या. त्यानुसार कालपर्यंत ३६१ हरकती व सूचना (Suggestions & Objections) आल्या होत्या. सोमवारी सायंकाळी उशीरापर्यंत ४५१ हरकती व सूचना प्राप्त झाल्या असून आतापर्यंत एकूण ८१२ हरकती व सूचना आल्या आहेत.

सन २०१७ मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीप्रसंगी प्रभाग पुनर्रचनेबाबत ६१३ हरकती व सूचना आल्या होत्या. त्या तुलनेत यावेळी १९९ हरकती व सूचना वाढल्याने एकूण संख्या ८१२ वर गेली आहे.

या सर्व हरकती व सूचनांमध्ये, झोपडपट्टीचे विभाजन नको, सीमा बदलू नका, नागरिकांची गैरसोय होऊ नये, प्रभागांचे विभाजन नको अशा स्वरूपाच्या सुचना आणि हरकती माेठ्या प्रमाणात आल्या आहेत. काही वार्डात कमी, जास्त विभाग तोडून दुसऱ्या वार्डात समाविष्ट केल्याबाबत काही तक्रारी आहेत. यात बहुतांश राजकीय पक्षांच्या अधिक व स्थानिक नागरिकांच्या कमी प्रमाणात हरकती व सूचना आहेत.

यामध्ये, सर्वात जास्त हरकती व सूचना या पश्चिम विभागात – ३३९ असून यामध्ये, अंधेरी पूर्व विभागात सर्वात जास्त ८५ हरकती व सूचना, त्यानंतर कांदिवली भागात -७६, बोरिवली भागात – ४६ हरकती व सूचना आल्या आहेत.

तसेच, पूर्व उपनगरात – २६३ हरकती व सूचना आल्या आहेत. यामध्ये, सर्वात जास्त ६३ हरकती व सूचना या कुर्ला भागात आहेत. तर शहर भागात सर्वात कमी म्हणजे ७६ हरकती – सूचना आल्या आहेत. विशेष म्हणजे कुलाबा भागात एकही हरकती व सूचना आलेली नाही.

या हरकती व सूचनांवर १४ ते २२ फेब्रुवारी या कालावधीत वर्गीकरण, छाननी करण्यात येईल. त्यानंतर २२ ते २६ फेब्रुवारी दरम्यान सुनावणी घेण्यात येणार आहे. यामध्ये, एकाच प्रकारच्या तक्रारी एकत्र करून ग्रुप सुनावणी केली जाईल. एका दिवसात ५ वार्डची सुनावणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर २६ ते २ मार्च पर्यंत प्रभाग रचना अंतिम करून त्याबाबतचा अहवाल २ मार्च रोजी पालिका निवडणूक विभागाकडून राज्य निवडणूक आयोगाला (State Election Commission) सादर करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here