@maharashtracity
मुंबई
शिवसैनिकानो शांतता बाळगा. कोणतीही चुकीची कृती करू नका. अतिरेकपणा करू नका. मी व यशवंत जाधव साहेब आणि संपूर्ण जाधव कुटूंबीय सर्व सुखरूप आहोत. तुम्ही आमच्या सोबत आहात. आम्हाला काहीही होणार नाही. आमची काळजी करू नका. याठिकाणी गर्दी करू नका. घोषणाबाजी करू नका, असे आवाहन शिवसेनेच्या आमदार यामिनी जाधव यांनी गेल्या दोन दिवसांपासून घरासमोर जमलेल्या शिवसैनिकांना केले आहे.
मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी शुक्रवारी साखरझोपेत असताना इन्कम टॅक्स विभागाच्या अधिकाऱ्यांनी अचानक धाड टाकली. तेव्हापासून ते शनिवारी दुपारपर्यंत यशवंत जाधव व आमदार यामिनी जाधव यांच्या चाहत्यांनी, समर्थकांनी जाधव यांच्या घरासमोर गर्दी करून घोषणाबाजी केल्याने तेथे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. याच कारणास्तव मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी शुक्रवारी इन्कम टॅक्स विभागाची कारवाई झाल्यावर तेथे जमलेल्या संतप्त शिवसैनिकांना आवरण्यासाठी भेट दिली होती.
मात्र, सुदैवाने यशवंत व यामिनी जाधव यांच्या समर्थकांनी कोणतीही चुकीची बाब अद्यापपर्यंत केलेली नाही. अन्यथा या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता निर्माण झाली असती. परिणामी पोलिसांना त्यांना आवरण्यासाठी बळाचा वापर करावा लागला असता.
इन्कम टॅक्स विभागाची झाडाझडती सुरूच
यशवंत जाधव यांच्या घरी शुक्रवारपासून इन्कम टॅक्स विभागाची कारवाई शनिवारी दुपारपर्यंत तरी सुरूच होती. इन्कम टॅक्स विभागाकडून जाधव यांच्या घराची कसून झाडाझडती सुरू होती. मात्र इन्कम टॅक्स विभागाच्या हाती नेमके काय लागले आहे, याबाबतची माहिती मिळू शकलेली नाही. तसेच, इन्कम टॅक्स विभागाकडून जाधव यांचे पीए व काही कंत्राटदारांच्या कार्यालयावर धाडसत्र व झाडाझडती सुरू असल्याचे समजते.